भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सुरक्षेतील गुंतवणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती आज (२७ सप्टेंबर) म्हणाले की, जर भारताने आपल्या लष्करामध्ये योग्य गुंतवणूक केली नसती तर देशाला गलवान आणि डोकलाममधील लढायांमध्ये विजय मिळवता आला नसता. “जर देशाने सुरक्षेत गुंतवणूक केली नसती तर आम्ही कारगिल, डोकलाममधील युद्ध हारलो असतो. जम्मू -काश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा, तसेच आपला ईशान्य प्रदेश अशांत झाला असता आणि नक्षलवाद्यांना मोकळं मैदान मिळालं असतं”, असं ते म्हणाले.

लष्करावरील खर्चाच्या युक्तिवादाला उत्तर देताना एका कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल मोहंती म्हणाले की, “जर तिबेटमध्ये मजबूत सशस्त्र सेना असती तर त्यांच्यावर कधीही आक्रमण झालं नसतं. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढलीच. पण त्याचसोबत, देशाला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ‘मोठा दर्जा’ देखील दिला गेला आहे. ते म्हणाले, “आज प्रत्येकजण भारताकडे एक सुरक्षा प्रदाता म्हणून पाहतो. ते एका मोठ्या राष्ट्राच्या विरोधात सुरक्षा कवच आहे.”

लेफ्टनंट जनरल मोहंती पुढे म्हणाले की, भारतीय सशस्त्र दल हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत. कारण ते जातीयता, जात आणि पंथ यांच्यावर उठतात. भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही राजकीय आकांक्षा नसतात आणि ते देशातील राजकारणाचा आदर करतात. इतर अशी अनेक उदाहरण आहेत जिथे लष्करी नेत्यांना राजकीय आकांक्षा असतात. मात्र, भारतीय लष्कर दलांची अशी कोणतीही इच्छा नाही” असं जनरल मोहंती यांनी स्पष्ट केलं आहे.