‘मध्यम बांधा, घनदाट काळे केस आणि पुढे आलेला दात’ सौगत मुखर्जीची ही ओळख नाही. त्याच्या कुटुंबासाठी तो असा कधीच नव्हता. पण १९९७ मधल्या एका हत्या प्रकरणात स्कॉटलँड येथील एका प्रकरणाच्या डायरीत त्याची ओळख या शब्दांमध्येच देण्यात आली. हे प्रकरण असं होतं ज्याने त्याला जवळपास २० वर्षांनी गाठलं. १९९० च्या दशकात सौगत मुखर्जी हा स्कॉटलँडमधल्या ग्लासगोमध्ये शिकायला होता. भारतात परतल्यावर त्याला अटक झाली. त्याने त्याचं जे आयुष्य उभं केलं होतं ते अक्षरशः उद्धवस्त झालं. २०२३ ला वयाच्या ४४ व्या वर्षी सौगत मुखर्जीने जगाचा निरोप घेतला. तो खरंतर निर्दोष होता हेदेखील समोर आलं. पण नैराश्य, दारुचं व्यसन, एका मागोमाग एक झालेले मानसिक आघात यामुळे तो जिवंत होता तेव्हाच मरण यातना भोगत होता. नेमकं काय घडलं होतं आपण जाणून घेणार आहोत.
सौगत मुखर्जीची पत्नी सपना मुंबईतल्या मालाडमध्ये वास्तव्यास
सौगत मुखर्जीची पत्नी सपना ही मुंबईतल्या मालाड या ठिकाणी एका टेक कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. स्कॉटलँड आणि भारतातील अधिकाऱ्यांच्या विरोधात ती लढा देते आहे. ती सांगते, “या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला चुकीच्या पद्धतीने अटक केली आणि पद्धतशीरपणे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला या कायदेशीर प्रक्रिया खरंतर करायच्या नव्हत्या पण जे काही घडलं आहे त्यामुळे कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या आमचं कुटुंब खचलं आहे. मानसिक आघातही झाले आहेतच. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून लढा देणं हे आम्हाला भाग आहे.”
ग्लासगो मधलं हत्या प्रकरण नेमकं काय?
२४ नोव्हेंबर १९९७ या दिवशी २१ वर्षीय ट्रेसी वाइल्डचा मृतदेह ग्लासगो येथील बर्मुलॉक या ठिकाणी असलेल्या तिच्या फ्लॅटमध्ये आढळून आला. ट्रेसीची हत्या गळा आवळून करण्यात आली आहे असं शवविच्छेदन अहवालात समोर आलं. ट्रेसी वाइल्ड ही देहविक्री करणारी महिला होती. तिच्या आधी आणि तिच्यानंतर म्हणजेच १९९१ ते १९९९ या कालावधीत देहविक्री करणाऱ्या सहा महिलांची हत्या झाली. या घटनांमध्ये पोलिसांना कुठलाही समान धागा थेटपणे आढळून आला नव्हता. त्यामुळे प्रत्येक हत्येची चौकशी स्वतंत्रपणे चालू होती. या कालावधीत भारतातील सौगत मुखर्जी हा विद्यार्थी ग्लासगोमध्ये होता. सौगत हा ओएनजीसीचे माजी संचालक श्यामल चंद्र मुखर्जी आणि सीमा मुखर्जी यांचा धाकटा मुलगा होता. श्यामल मुखर्जी हे ओएनजीसीमध्ये लॉजिस्टिक विभागाचे संचालक होते. ग्लासगो कॉलेज ऑफ नॉटिकल स्टडिज मध्ये सौगत हा दोन वर्षांचा कोर्स करत होता. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी व्हायचं हे त्याचं स्वप्न होतं. सौगत ग्लासगोतील पार्टिक भागात वास्तव्यास होता. सौगत तेथील मॉल आणि रेस्तराँमध्ये पार्ट टाइम नोकरी करुन त्याचा खर्च भागवत होता. सौगतच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी त्याच्या कॉलेजजवळ एक दरोडा पडला होता. याबाबत सौगत जेव्हा पोलिसांकडे तक्रार करायला गेला तेव्हा त्यालाच एक दिवस तुरुंगात राहिला होता. सपना मुखर्जीने म्हणजेच सौगतच्या पत्नीने हे सांगितलं की तेव्हा सौगत फक्त १९ वर्षांचा होता आणि त्यालाच तुरुंगात ठेवलं गेल्याने तो घाबरलाही होता. इकडे ट्रेसी वाइल्डची हत्या झाली त्याच काळात सौगतने ग्लासगो सोडलं होतं. स्कॉटलँडच्या पोलिसांना याच एका गोष्टीमुळे सौगतवर संशय आला होता.

सौगत भारतात परतल्यावर काय घडलं?
सौगत मुखर्जी भारतात आला तेव्हा त्याची आणि माझी भेट मुंबईतल्या लाला लजपत राय कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये झाली. त्या काळी आमच्याकडे पेजर होते. नंतर फोन नंबर घेतले. सौगतची आणि माझी चांगली मैत्री झाली. ग्लासगो मध्ये आलेले सगळे अनुभव त्याने मला सांगितले होते. आम्ही एकमेकांवर प्रेम करु लागलो आणि १९९९ मध्ये आम्ही प्रेमविवाह केला असंही सपना यांनी सांगितलं. आम्ही लग्नानंतर सिंगापूरला गेलो. सौगत तिथे राहून मेकॅनिकल इंजिनिअर झाला तर मी नर्स प्रॅक्टिशनर म्हणून शिक्षण पूर्ण केलं. २००५ मध्ये जेव्हा सपना आणि सौगत भारतात आले तेव्हा त्यांना तीन मुलं झाली होती आणि त्यांचं आयुष्य सुरळीत सुरु होतं.

२०१३ मध्ये काय घडलं?
स्कॉटलँड पोलिसांच्या कोल्ड केस रिव्ह्यू टीमने ट्रेसी वाइल्ड हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु केला. तपासाचा मुख्य आधार होता ट्रेसीच्या शरीरावर पाच ठिकाणांहून मिळालेले डीएनए नमुने. तसंच सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळालं ज्यामध्ये अंदाजे ३० ते ४० वर्षांचा एक माणूस अस्पष्टपणे दिसत होता. याच दरम्यान सौगतकडे संशयाची सुई वळली. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार ग्लासगो पोलिसांनी संशयिताचं एक रेखाचित्र तयार केलं होतं त्यात संशयिताचे दात पुढे होते. एवढ्याच एका आधारावर सौगतला संशयित ठरवण्यात आलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
सौगतला अटक कधी झाली?
ऑगस्ट २०१४ मध्ये स्कॉटलँड पोलिसांनी इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीसची मागणी केली. डिसेंबर २०१४ मध्ये स्कॉटलँडच्या क्राउन ऑफिसने पुरेसे पुरावे असल्याचा दावा केला आणि त्यानंतर सौगतला अटक करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली. ९ जानेवारी २०१५ या दिवशी मुंबईतल्या मालाड या ठिकाणी आमच्या घरी पोलीस आले आणि त्यांनी सौगतला विचारण्यास सुरुवात केली की तू ग्लासगोमध्ये काय केलं? ते सातत्याने विचारत होते आणि सौगत सातत्याने एकच उत्तर देत होता काहीच नाही असं सपना यांनी सांगितलं. सौगतला हे माहीतही नव्हतं की त्याच्यावर हत्येचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला त्याला मुंबई पोलिसांच्या एक्स्ट्राडिशन सेलने अटक केली. त्यानंतर सौगत २४ दिवस ऑर्थर रोड तुरुंगात होता असंही सपना मुखर्जीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. पण जुलै महिन्यापर्यंत त्याला कोर्टात जावं लागत होतं.
२०१९ च्या मुलाखतीत सौगत मुखर्जी काय म्हणाला होता?
ग्लासगो या ठिकाणी मी माझा कोर्स पूर्ण करु शकलो नाही, पण त्यामुळे मला खुनी कसं काय ठरवण्यात आलं? मला बलात्कारी आणि खुनी म्हणून जगासमोर उभं केलं गेलं. मी धोकादायक अशा कैद्यांसह तुरुंगात होता. तो काळ माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट आणि अपमानास्पद काळ होता. मी आयुष्यात झुरळही मारलेलं नाही आणि मला हत्येच्या आरोपात अटक झाली असं सौगतने सांगितलं होतं.
सौगतला जामीन मिळाला पण कलंक राहिलाच
सौगतला जामीन मिळाला पण ‘खुनी’ या कलंकाने त्याची पाठ सोडली नाही. सपनाने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की हे सगळं घडल्यानंतर आमच्या नातेवाईकांनी सौगतवर बहिष्कार घातला. ते आमच्याशी संवाद साधायचे, एखादा कार्यक्रम असेल तर ते मला सांगायचे तू तुझ्या मुलांना घेऊन ये सौगतला आणू नकोस. सौगतसाठी हे सगळं फार वेदनादायी होतं असंही सपना यांनी सांगितलं. सौगतला खोट्या गुन्ह्यात अडकवलंय म्हणून आम्ही खटला दाखल केला. त्यासाठी १४ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. कांदिवली आणि नेरुळ या ठिकाणी असलेली दोन घरं विकावी लागली असंही सपनाने सांगितलं. सौगत या कालावधीत नैराश्यात गेला. तो आमच्यापासून दूर राहू लागला आणि त्याला झटके येऊ लागले, तसंच दारुचं व्यसन जडल्याने लिव्हर सोरायसिस झाला. त्याने नोकरी मिळवण्याचे प्रयत्नही केले. पण खुनी असा कलंक माथी लागल्याने त्याला नोकरीही मिळाली नाही.
२४ एप्रिल २०१९ ला काय घडलं?
२४ एप्रिल २०१९ ला सौगतला हे कळलं की ट्रेसी वाइल्ड प्रकरणातला खुनी सापडला आहे. चीनमधला झी मिन चेन याने ट्रेसी वाइल्डचा खून केल्याची कबुली दिली. ज्यानंतर ग्लासगो न्यायालायने झी मिन चेनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेनंतर १ मे २०१९ या दिवशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौगत मुखर्जीला पत्र लिहून कळवलं की त्याच्या विरोधातल्या सगळ्या प्रक्रिया थांबवण्यात येत आहेत आणि तो या प्रकरणात निर्दोष आहे. यानंतर सौगत काहीसा सावरला पण ते फक्त आमचं वाटणं होतं. कारण सौगत आतून पूर्णपणे कोसळला होता. सौगतचा मोठा भाऊ सौरव यांनी २०२५ मध्ये “I Want to Break Free: A Fictionalized Memoir of a Life Gone Too Soon” हे पुस्तक लिहिलं आहे अशी माहिती सपनाने दिली. सपनाने सांगितलं, सौगतने एकदा त्याच्या बाबांना विचारलं होतं ट्रेसी वाइल्ड प्रकरणात खरा खुनी सापडला नाही तर माझ्या आयुष्यावरचा खुनी हा कलंक कधीच पुसला जाणार नाही का? आज तोच प्रश्न माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच मनात घर करुन राहिला आहे.
