भारतीय लष्कर पुन्हा एकदा कारगीलसारखी परिस्थिती उद्भवून देणार नाही, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी सांगितले. ते शनिवारी कारगिल विजयदिनानिमित्त द्रास येथे या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कारगिल विजयाचे हे सोळावे वर्ष असून, या दिनाला विजय दिन असे नाव देण्यात आलेले आहे. लष्कराचे जवान सतर्क असून, पुन्हा कारगिल होऊ देणार नाहीत. आपले सैन्य पाकिस्तानला पुन्हा भारतीय हद्दीवर ताबा घेऊ देणार नाही. पाकिस्तानच्या कारवायांना तोंड देण्यासाठी आपले जवान सीमेवर सतर्क असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १९९९ सालच्या मे महिन्यात सुरू झालेले कारगील युद्ध दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालले होते. या युद्धात भारतीय लष्कराचे ४९० जवान शहीद झाले होते.