Pahalgam Attack : येत्या २२ एप्रिलला म्हणजेच आणखी दोन दिवसांनी पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होईल. भारतीय वायुदलात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाने त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्याचं ठरवलं आहे. टागे हॅलियांग यांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारुन ठार केलं. देशासाठी शहीद झालेल्या या वीराची आठवण म्हणून हे स्मारक उभारलं गेलं आहे.

पहलगामच्या हल्ल्यात २६ निरपराधांचा मृत्यू

२२ एप्रिल २०२५ ला झालेल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातल्या २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निरपराध पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. २६ मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. टागे हॅलियांग यांच्या कुटुंबाने सांगितलं की अरुणाचल प्रदेशातील ताजंग या ठिकाणी हे स्मारक बांधण्यात आलं आहे. आम्हाला त्यांची आठवण कायम जपायची आहे. शिवाय जगालाही हे लक्षात राहिलं पाहिजे की टागे हॅलियांग यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अशा पद्धतीने प्राण गमावले. टागे यांचे प्राण का गेले ते लोकांना समजलं पाहिजे यासाठी आम्ही हे स्मारक उभारलं आहे अशी माहिती टागे यांचे मोठे बंधू टागे ताका यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

टागे यांचा विहा चारोशी झाला होता, ते पहलगामला फिरायला गेले होते

टागे यांचा विवाह चारो कमुहा यांच्याशी पहलगाममध्ये हल्ला होण्याच्या चार महिन्यांपूर्वीच झाला होता. पहलगाम या ठिकाणी हे नवविवाहीत जोडपं फिरायला गेलं होतं. जे काही घडलं त्यामुळे आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. टागे यांच्या मृत्यूचा माझ्या आई वडिलांच्या मनावर गहिरा परिणाम झाला आहे. मी देखील एक बाप आहे, मला कल्पना आहे की मुलगा गमावल्यानंतर माझ्या आई वडिलांना काय वाटत असेल. माझ्या वडिलांचा अजूनही विश्वास बसत नाही की टागे यांचा मृत्यू अशा पद्धतीने झाला आहे. आमच्या भावाला जाऊन एक वर्ष झालं आहे पण आमच्या मनावर झालेल्या जखमा या आजही ताज्या आहेत, भळभळत्या आहेत.

Pahalgam Terror Attack
२२ एप्रिल २०२५ ला पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात लोकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

संतोष जगदाळे यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर

पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील संतोष जगदाळे. संतोष जगदाळे हे ५० वर्षीय व्यावसायिक होते. पहलगामला ते फिरायला गेले होते आणि दहशतवाद्यांनी त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. संतोष हे त्यांच्या घरी एकमेव कमवते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूनंतर जगदाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संतोष जगदाळे हे त्यांची पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी यांच्यासह पहलगामला गेले होते त्याचवेळी हा हल्ला झाला ज्यात जगदाळे ठार झाले. या दोघींच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी संतोष जगदाळेंची हत्या केली. या दोघींच्या डोळ्यांसमोरुन अजूनही तो प्रसंग गेलेला नाही. आजही रात्री आम्ही दचकून जाग्या होतो, असं वाटतं बाबांवर हल्ला झालाय. आसावरीने अशी आठवण इंडियन एक्स्प्रेसला सांगितली. तसंच जे वर्ष निघून गेलं ते आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि बिकट वर्ष होतं. आसावरीने सांगितलं की आईला आधार देण्यासाठी तिला तिची नोकरी सोडावी लागली. तसंच सरकारकडून जे मदतीचं आणि नोकरीचं आश्वासन मिळालं होतं ते अद्याप पूर्ण झालेलं नव्हतं ते अखेर ११ महिन्यांनी पूर्ण झालं अशी खंतही आसावरीने बोलून दाखवली.

आसावरी जगदाळेने काय सांगितलं?

आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं. पण त्या आश्वासनापलिकडे आम्हाला काहीही मिळालेलं नाही. आम्ही आमची खंत लोकांसमोर बोलून दाखवतो. तसंच आमच्याशी कुणीही अधिकृतरित्या कुठलाही संपर्क साधलेला नव्हता. ही घटना घडल्यानंतर ११ महिन्यांनी पुणे महापालिकेत मला नोकरी मिळाली आहे. आता मला आईला व्यवस्थित सांभाळता येईल अशी आशा आहे असं आसावरी जगदाळेने सांगितलं. नोकरी लागल्याने आर्थिक बाजू सावरली असली तरीही आमचे वडील हिरावले गेले आहेत. ती जखम भरुन न येणारीच आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

संजय लेले-डोंबिवली
अतुल मोने-डोंबिवली
हेमंत जोशी-डोंबिवली
कौस्तुभ गणबोटे-पुणे
संतोष जगदाळे-पुणे
दिलीप भोसले-पनवेल

काश्मीरमध्ये सुरक्षेचे निकष अधिक कठोर

पहलगामचा हल्ला लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांनी केला होता. या हल्ल्याला २२ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच पहलगाम या ठिकाणी सुरक्षेबाबत आणखी काळजीही घेतली जाते आहे. येणाऱ्या पर्यटकांचा पत्ता, नाव, आधारची माहिती, त्यांच्या नोंदणीचे तपशील हे सगळं तपासलं जातं आहे.