नवी दिल्ली : राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी पूर्ण करून १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने बुधवारी आंदोलक कुस्तीगिरांना दिले. त्यानंतर कुस्तीगिरांनी आपले आंदोलन १५ तारखेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याबरोबर कुस्तीगीर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, साक्षीचे पती सत्यव्रत कादियान यांनी तब्बल साडेपाच तास चर्चा केली. मात्र आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेली विनेश फोगट बैठकीला गैरहजर होती. आपल्या (पान १० वर) (पान १ वरून) सूचना, शिफारशी व मागण्या मान्य करण्यात आल्याचे कुस्तीगिरांनी बैठकीनंतर सांगितले. आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही ठाकूर यांनी दिले. ब्रिजभूषण यांच्या विरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची केंद्र सरकारची विनंती कुस्तीगिरांनी मान्य केली. बैठकीत चर्चिल्या गेलेल्या मुद्दय़ांची माहिती खाप पंचायती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांना दिली जाईल व त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बजरंग पुनियाने बैठकीनंतर सांगितले.




ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीगिरांनी दिल्लीत जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन केले. नव्या संसदभवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी, २८ मे रोजी पोलिसांनी आंदोलन मोडून काढले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पाच दिवसांपूर्वी बैठकीनंतर प्रक्रियेने वेग घेतला.
आश्वासने काय?
* राष्ट्रीय कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत होईल.
* ब्रिजभूषण, त्यांचे निकटवर्तीय निवडणूक लढणार नाहीत.
* निवडणूक होईपर्यंत तात्पुरती समिती कामकाज पाहील.
* समितीमध्ये आंदोलकांनी शिफारस केलेले २ सदस्य असतील.
* तक्रार निवारण समिती नियुक्त केली जाईल, तिची अध्यक्ष महिला असेल.
* खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.
मध्यस्थीसाठी सरकारवर दबाव
‘युनायटेड वल्र्ड रेसिलग’ने महिला कुस्तीगिरांना पाठिंबा देत राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निलंबनाचा इशारा दिला होता. केंद्र सरकारच्या आंदोलनाच्या हाताळणीवरून परदेशातून नाराजी व्यक्त होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन आठवडय़ांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याने कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया उमटू न देण्याची दक्षता सरकारकडून घेतली जात आहे. शिवाय, भाजपच्या महिला नेत्यांमध्येही अस्वस्थता असून पश्चिम उत्तर प्रदेशातील भाजप नेते उघडपणे कुस्तीगिरांना पाठिंबा देत आहेत.