नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळय़ापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाची हिंसक पद्धतीने सांगता झाली. ‘महिला महापंचायत’ भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीगिरांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर जंतर-मंतर येथील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले. ऑलिम्पिक विजेते कुस्तीगीर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट तसेच, विनेश फोगट यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी नव्या संसद भवनाबाहेर महापंचायत भरविण्याचा निर्णय कुस्तीगिरांनी घेतला होता. मात्र, संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ात कोणतीही बाधा येऊ नये, याची दक्षता घेत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. तरीही रविवारी दुपारी जंतर-मंतरभोवती असलेली नाकाबंदी तोडून आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आक्रमक महिला कुस्तीगिरांना महिला पोलिसांनी त्यांच्यावर झेप घेऊन रोखले. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतरमंतरवरील तंबू उखडून टाकले. आंदोलकांनी आणलेल्या गाद्या, चटया, कुलर, पंखे, ताडपत्री, इतर साहित्यही बाजूला केले आणि संध्याकाळपर्यंत आंदोलन पूर्णपणे मोडून काढले. मोर्चाला परवानगी दिली नव्हती, तरीही आंदोलकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. कुस्तीगिरांना धक्काबुक्की करून फरफटत बसगाडय़ांमध्ये कोंबण्यात आले असा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांना ताब्यात घेऊन दिल्लीतील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांत नेले गेले. चार कुस्तीगिरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तक्रारीची केंद्र सकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून महिला कुस्तीगीर जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तेक्षपामुळे अखेर दिल्ली पोलिसांना ब्रिजभूषण विरोधात गुन्हा दाखल करावा लागला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या आंदोलनाला विविध खाप पंचायती, हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे. महिला पंचायतीसाठी मोठय़ा प्रमाणावर शेतकरी दिल्लीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन शनिवारपासून पोलिसांनी सिंघू, टिकरी, गाझिपूर या दिल्लीच्या सीमा बंद केल्या होत्या. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनाही गाझीपूर सीमेवर अडवण्यात आले. हरियाणातील भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरुनाम चढुणी यांना घरातच नजरबंद केले गेले. दिल्लीमध्येही संसद भवनाच्या तीन-चार किमी परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. मेट्रो रेल्वेतून हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून आंदोलक संसदेपर्यंत पोहोचतील या भीतीने केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन ही दोन्ही मेट्रो स्थानके दिवसभरासाठी बंद केली गेली. रविवारी दिल्लीभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशभरातून निषेध महिला कुस्तीगिरांविरोधातील पोलिसांच्या कारवाईचा देशभरातून निषेध केला जात आहे. कुस्तीगिरांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. शेतकरी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘संयुक्त किसान मोर्चा’नेही निवेदनाद्वारे आंदोलकांच्या धरपकडीचा निषेध केला. नव्या संसदभवनाच्या उद्घाटनदिनी केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही व्यवस्थेवर लाजीरवाणा हल्ला केला आहे. भारतीय लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीका मोर्चाच्या निवेदनात करण्यात आली आहे. ‘राज्याभिषेक झाला, दडपशाही सुरू’ नव्या संसद भवन उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कुस्तीगीर आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तोफ डागली. ‘राज्यभिषेक सोहळा झाला, आता अहंकारी राजा जनतेचा आवाज दडपून टाकत आहे,’ अशी टीका त्यांनी केली. काँग्रेससह आप, तृणमूल काँग्रेस, भाकप-माकप आदी विविध राजकीय पक्षांनी सरकारला धारेवर धरले. आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना बुटांनी मारहाण केली. कट्टर दहशतवादी असल्यासारखे महिला कुस्तीगिरांना फरफटत नेले. मुलींना इतकी क्रूर वागणूक देणारे कोणत्या तोंडाने मुलींच्या न्यायाची भाषा करणार, असा संतप्त सवाल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला. लैंगिक शोषण करणारा गुंड आज संसदेत बसला आहे आणि आम्हाला रस्त्यावर फरपटत नेले जात आहे. भारतीय खेळाडूंसाठी आजचा दिवस अत्यंत दु:खदायी आहे. - साक्षी मलिक क्रीडापटूंना कोणते सरकार अशी वागणूक देते? आम्ही कोणता गुन्हा केला आहे? - बजरंग पुनिया