पीटीआय, बीजिंग
चीनच्या संसदेने अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदतवाढ देण्यावर शिक्कामोर्तब केले. येथे सुरू असलेल्या कायदे मंडळाच्या अधिवेशनात एकमताने हा निर्णय घेण्यात आला. चीनच्या अध्यक्षपदाचा तिसराकार्यकाळ मिळणे ही दुर्मिळ घटना असून त्यातून जिनपिंग यांची वाढलेली राजकीय ताकद दिसते, त्याबरोबरच चीन पुन्हा एकदा माओ काळातील एकचालकानुवर्ती पद्धतीकडे जात असल्याचे मानले जात आहे.
नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) या चीनच्या कायदे मंडळात कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने यासंबंधी प्रस्ताव मांडला आणि एनपीसीच्या २,५९२ सभासदांनी अपेक्षेप्रमाणे त्याला सहमती दर्शवली. क्षी जिनपिंग सध्या ६९ वर्षांचे असून त्यांच्याकडे आजीवन राष्ट्राध्यक्षपद राहील असे मानले जाते. त्यांच्याकडे सर्वशक्तिशाली सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपददेखील आहे. चीनच्या लष्करामध्ये तब्बल २० लाख जवान आणि अधिकारी असून ते जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर मानले जाते. त्याशिवाय क्षी यांच्याकडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या जनरल सेक्रेटरी या सर्वोच्च पदाची जबाबदारी आहे. क्षी यांच्या हाती सर्व सत्ता एकवटल्यामुळे त्याचे देशांतर्गत पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने व्यापक परिणाम होतील असे निरीक्षकांचे मत आहे.
उदारमतवादी पित्याचा कठोरहृदयी मुलगा
क्षी जिनपिंग यांचे पिता क्षी झाँगक्सन यांनी चीनचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. ते उदारमतवादी विचारांचे असल्यामुळे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे संस्थापक माओ झेदाँग यांनी त्यांना त्रास दिला होता. क्षी जिनिपग हे मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे मानले जातात. त्यांच्याकडे २०१२ साली पक्षाचे नेतृत्व आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून १० लाखांपेक्षा जास्त अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती.