Xi Jinping Hongqi N701 Features: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जिनपिंग यांचा हा दौरा राजनैतिक दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या अत्याधुनिक ताफ्याबाबत नेहमीच चर्चा होत असते. सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेसाठी रशिया आणि चीनकडून जी खबरदारी घेतली जाते, त्याकडे अनेकांचे लक्ष असते.

चीनच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी खास तयार करण्यात आलेली अत्यंत सुरक्षित आणि बुलेटप्रूफ लिमोझिन – ‘हाँगकी एन७०१’ (Hongqi N701) वापरली जाते. भारताच्या दौऱ्यातही जिनपिंग यांच्या दिमतीला ही अत्याधुनिक कार असणार असल्याचे बोलले जाते.

जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यात ‘हाँगकी एन७०१’ सज्ज

एन७०१ हे मॉडेल हे कार शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत नाही. हे वाहन चिनी लक्झरी ब्रँड ‘हाँगकी’ने विशेष सरकारी वापरासाठी तयार केले आहे. ‘हाँगकी’ या शब्दाचा चिनी भाषेत अर्थ ‘लाल बावटा’ असा होतो. यापूर्वी जिनपिंग यांच्या अमेरिका, रशिया, हॉंगकॉंग आणि इजिप्तच्या परदेश दौऱ्यांदरम्यान हीच कार वापरण्यात आली होती.

एनटीडीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील एका दशकात केवळ सरकारी वापरासाठी या मॉडेलच्या केवळ ५० गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. राष्ट्रप्रमुखांच्या वाहनांच्या सुरक्षेचे निकष गोपनीय ठेवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रथेनुसार, हाँगकी कंपनीने या कारचे तांत्रिक तपशील किंवा सुरक्षेची अचूक मानके अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाहीत.

कशी आहे ही अभेद्य लिमोझिन?

हाँगकी एन७०१ ची लांबी साधारण ५.५ मीटर (सुमारे १८ फूट) असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२५ मधील चीन दौऱ्यात वापरल्या गेलेल्या ‘हाँगकी एल५’ या मॉडेलशी या कारचे काही तांत्रिक साधर्म्ये आहेत. मात्र सर्वसामान्य ‘एच९’ या मॉडेलपेक्षा तिचा आकार आणि रचना पूर्णपणे वेगळी आहे.

या कारला २१ इंची बुलेटप्रूफ चाके आणि टायर आहेत. गोळीबार रोखू शकणाऱ्या काचा तसेच बाहेरच्या बाजूला मजबूत आर्मर प्लेटिंग देण्यात आले आहे. बॉम्ब आणि रासायनिक हल्ल्यांपासून आत बसलेल्या प्रवाशांचे रक्षण करण्याची क्षमता यात आहे. ही कार लहान स्वरूपाचे बॉम्बस्फोट झेलण्यास सक्षम असल्याचे समजते. तसेच संभाव्य रासायनिक हल्ल्यापासून प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी यामध्ये विशेष अंतर्गत ‘एअर-कॉम्प्रेशन’ प्रणाली बसवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र कंपनीने याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

या कारमध्ये ६.०-लिटर क्षमतेचे V12 इंजिन असण्याची शक्यता वर्तवली जाते, जे सुमारे ४०८ हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करते. त्याचबरोबर कंपनीकडे V8 इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.

पारंपरिक आणि शाही चिनी डिझाइन

हाँगकी एन७०१ ची बाह्य रचना पारंपरिक आणि अत्यंत भारदस्त आहे. कारच्या दर्शनी भागात उभे पट्टे असलेली भव्य ग्रिल आणि स्मोक्ड हेडलाइट्स देण्यात आले आहेत. बोनेटवर ठळक लाल झेंड्याचे लोगो असून पुढील फेंडर्सवरही लाल रंगाचे बॅज कोरण्यात आले आहेत.

बारीक क्रोम बॉर्डर, रुंद बी-पिलर्स आणि साध्या रचनेचे एलईडी टेल-लॅम्प्स कारला राजेशाही आणि अधिकारसंपन्न लुक देतात. आधुनिक लक्झरी गाड्यांप्रमाणे भपकेबाज न दिसता, सरकारी दबदबा आणि चीनचे औद्योगिक सामर्थ्य अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ही गाडी डिझाइन करण्यात आली आहे.

चीनमधील ‘हाँगकी’चा वारसा

१९५८ मध्ये स्थापन झालेला हाँगकी ब्रँड चिनी राज्यकर्ते आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांशी पूर्वापार जोडला गेला आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठीची कार न राहता, हा ब्रँड नेहमीच सरकारी महत्त्वाचे प्रतीक मानला गेला.

अलिकडच्या वर्षांत हाँगकीने आपला विस्तार करत सेदान, एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. तरीही एन७०१ मॉडेल हे चिनी सत्तेचे आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख वाहन मानले जाते. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीननिर्मित ही लिमोझिन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या केंद्रस्थानी राहणार आहे.