BRICS Summit 2026 : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करताना पाहायला मिळतात. अमेरिकेने भारतावर अनेकदा अतिरिक्त आयातशुल्क देखील लादलं. त्यामुळे अमेरिका-भारत संबंध ताणले गेले होते. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या हालचाली करत असल्याचं सांगितलं जातं. या माध्यमातून भारत, चीनसह आणखी पाच देशांची कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे.

या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे लवकरच भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शी जिनपिंग हे सप्टेंबरमध्ये भारतात येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले होते. ही घटना घडल्यानंतर दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्य तैनात केलं होतं. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर भारतात चिनी गुंतवणुकीवर निर्बंध, आयातीवरील कडक तपासणी आणि कोरोनाच्या काळात दोन्ही देशातील विमानांची उड्डाणे थांबवण्यात आल्याने त्याचा मोठा परिणाम झाला होता. पण आता अलिकडच्या काही महिन्यांत हा तणाव कमी झाला असून दोन्ही बाजूंनी संवाद सुरू असल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, २०२० मधील गलवान खोऱ्यातील निर्माण झालेल्या तणावानंतर भारत-चीन संबंध हळूहळू सुधारत आहेत. आता १२ आणि १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत ब्रिक्स (BRICS) परिषद होणार आहे. या ब्रिक्स परिषदेला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याच परिषदेसाठी शी जिनपिंग हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच उच्च-स्तरीय चर्चेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील चीनचा दौरा करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत किंवा यावर अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.