ब्रिक्स (BRICS) परिषदेसाठी उपस्थित राहिलेले विविध देशांचे नेते, इतर सहभागी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींसाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य स्नेहभोजनाचे (गाला डिनर) आयोजन केलं होतं. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या स्नेहभोजनाला उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अबुधाबीचे युवराज (क्राउन प्रिन्स) शेख खालिद बिन मोहम्मद हे देखील या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, कारण परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते लगेच आपल्या मायदेशी रवाना झाले होते. शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण तत्काळ समजू शकले नसले, तरी ते विश्रांतीसाठी आपल्या हॉटेलवर परतले असावेत, असा अंदाज एका सूत्राने वर्तवला आहे.
जिनपिंग हे शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले होते, त्यानंतर त्यांनी ब्रिक्स परिषदेला हजेरी लावली आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेतली. तब्बल सात वर्षांनंतर ते भारत दौऱ्यावर आले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर ब्रिक्स नेत्यांनी या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली.
केंद्रीय आणि राज्यातील मंत्रीही गाला डिनरला हजर
तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव आणि शिवराज सिंह चौहान यावेळी उपस्थित होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री संसद भवनातून दोन बसमधून या स्नेहभोजनाचे ठिकाण असलेल्या भारत मंडपम येथे पोहोचले.
डिनरमध्ये खास काय?
या स्नेहभोजनाच्या मेन्यूमध्ये खांडवी मिल-फ्युल, खुंभ गलौटी, पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक, गाजर-बीन्स पोरियाल आणि मिलेट (धान्य) पुलाव यांचा समावेश होता. तर गोड पदार्थांमध्ये जलेबीसोबत पुरानी दिल्लीची फ्रूट क्रीम आणि फिरणी वाढण्यात आली होती. भारत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भूषवत असून, यामध्ये ११ सदस्य देश आणि १० भागीदार देशांचे नेते तसेच काही आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या स्नेहभोजनाला अनेक ब्रिक्स नेते आणि भारतीय मान्यवर उपस्थित राहिले, तर शी जिनपिंग आणि अबुधाबीचे युवराज हे या कार्यक्रमातील प्रमुख अनुपस्थित राहिल्याने चर्चा झाली.
