पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. या अनौपचारिक दौऱ्यात चीनच्या वादकांनी मोदींना सुखद धक्का दिला. मोदींच्या सन्मानार्थ या वादकांनी चक्क हिंदी गाणं वाजवून त्यांचं स्वागत केलं. हे गाणं होतं १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषी कपूर यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं, ‘तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा’. या गाण्याचं इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन ऐकून मोदीसुद्धा भारावून गेले आणि वादकांसाठी टाळ्या वाजवत त्यांनी कौतुक केलं.

मोदींचं दणक्यात स्वागत करत चीनने त्यांना अनोख्या पद्धतीने ‘दिल की बात’ सांगितली. तर ऋषी कपूर यांनी मूळ गाणं पुन्हा एकदा ट्विटरवर शेअर केलं.

वाचा : ‘हृदयनाथ’मध्ये जॅकी श्रॉफचा मराठमोळा अंदाज

विशेष म्हणजे यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बरेच बॉलिवूड चित्रपट पाहिल्याचं सांगितलं. बॉलिवूड चित्रपटांचं कौतुक करतानाच काही भारतीय प्रादेशिक चित्रपटसुद्धा आपल्याला आवडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चीनमध्ये आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’, सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ यांसारखे चित्रपट तुफान गाजले. चिनी प्रेक्षकांसोबतच राष्ट्राध्यक्षांनाही बॉलिवूड चित्रपटांनी भुरळ घातल्याचं पाहायला मिळत आहे.

मोदींच्या या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी चीनला औपचारिक दौऱ्यावर गेलेले नाहीत. मात्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांबाबत विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे.