Xi Jinping Visit India BRICS Summit: चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीला येणार आहेत. चीनने देखील या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर पहिलाच दौरा

२०२० मधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले होते. या चकमकीत २० भारतीय सैनिक आणि काही चिनी सैनिक मारले गेले होते. त्यानंतर क्षी जिनपिंग यांचा गेल्या सात वर्षांतील पहिलाच भारत दौरा ठरणार आहे. २०१९ मध्ये जिनपिंग यांनी चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे पंतप्रधान मोदींबरोबर एका परिषदेसाठी भारताचा दौरा केला होता. त्याआधी सप्टेंबर २०१४ मध्ये शी जिनपिंग पहिल्यांदा भारतात आले होते. यानंतर २०१६ मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेसाठी त्यांनी गोव्यात हजेरी लावली होती.

संबंधांमध्ये सुधारणा

दरम्यान, गेल्या काही वर्षात भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी चीनला भेट दिली होती. २०२० च्या चकमकींनंतर भारताने चिनी गुंतवणुकीवर लादलेले काही निर्बंध शिथिल केले आहेत ,विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, कॅपिटल गुड्स आणि सोलर सेल क्षेत्रांवर भर दिला गेला आहे.

गुंतवणुकीची तपासणी

चिनी कंपन्यांच्या भारतातील प्रस्तावित गुंतवणुकीची आता खुद्द बीजिंगकडूनच अधिक कडक तपासणी केली जात आहे, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले. चीनचा अत्याधुनिक उत्पादन आणि उच्च-तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या क्षेत्रांच्या तपासणीवर भर आहे. BRICS नेत्यांच्या बैठकीसाठी जिनपिंग भारतात येणार आहेत का? याबाबत चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी उत्तर दिले नव्हते. त्यांना याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते.