चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बुधवारी पश्चिम आशियातील संघर्ष तातडीने थांबविण्याचे आवाहन केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर त्यांनी प्रादेशिक तणावावर चर्चा केली. परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचल्याचे ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीन दौरा केला. त्यानंतर काही दिवसांतच रशियाचे अध्यक्ष पुतिन हेदेखील चीन दौर्यावर आले आहेत.

त्यांचे मंगळवारी रात्री चीनमध्ये आगमन झाले. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी त्यांचे स्वागत केले. जिनपिंग यांनी बुधवारी सकाळी पुतिन यांचे ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ येथे स्वागत केले. चीन आणि रशिया यांचे इराणशी सलोख्याचे आणि आर्थिक, लष्करी संबंध आहेत. या संबंधांचा वापर करून होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ते इराणचे मन वळवू शकतात, असे मानले जात आहे. यामुळे जिनपिंग-पुतिन चर्चेकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिनपिंग यांनी पश्चिम आशियामध्ये पुन्हा संघर्षास सुरुवात होऊ न देणे आणि चर्चा सुरू ठेवण्यावर भर दिला. हा संघर्ष लवकर संपला, तर ऊर्जापुरवठा आणि उद्योगांची पुरवठासाखळी सुरळीत होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आणि अशांत असल्याचे सांगून एकतर्फी निर्णय घेण्याची प्रवृत्ती आणि वर्चस्ववाद वाढू लागल्याची टीका त्यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता केली. चीन, रशियाने जागतिक प्रशासन व्यवस्थेसाठी एकत्र काम केले पाहिजे, असे जिनपिंग म्हणाले.