चीनवर दादागिरी कराल तर डोकं ठेचू – शी जिनपिंग यांचा जागतिक सत्तांना इशारा

चीनच्या जनतेनं केवळ जुनं जग गाडलं नाही तर, नवं विश्व उभं केलं आहे असं कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दीनिमित्त देशाला संबोधित करताना जिनपिंग म्हणाले

Xi jinping
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जगभरातल्या सर्व देशांना इशारा दिला आहे.

चीनविरोधात दादागिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी शक्तींचं डोकं ठेचू अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अन्य राष्ट्रांना इशारा दिला आहे. चीनच्या जनतेनं नवं विश्व उभं केलं आहे असं सांगत त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दीनिमित्त देशाला संबोधित केलं.

तिआनमेन चौकात तासभर केलेल्या भाषणामध्ये लष्कर प्रबळ करणं, तैवानला चीनमध्ये एकजीव करणं आणि हाँगकाँगमध्ये सामाजिक स्थैर्य आणणं हे अग्रक्रम असल्याचं जिनपिंग यांनी सांगितलं. रॉयटर्सनं या संदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. जुन्या विश्वाला गाडण्यात केवळ चिनी जनता कुशल नाही तर आपण नवं विश्व निर्माण केलं आहे असं ते म्हणाले. पीपल्स रिपब्लिकचे संस्थापक माओ झेडांग यांच्यानंतरचं सगळ्यात ताकदवान नेतृत्व असं गौरवण्यात येणाऱ्या जिनपिंग यांनी केवळ समाजवादच चीनला तारू शकतो असं म्हटलं आहे.

हेही वाचा- चीनची कम्युनिस्ट पार्टी उद्या शंभरी पार करणार! शी जिनपिंग यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

झिंजियांगमध्ये अल्पसंख्याकांना दिली जाणारी वागणूक आणि हाँगकाँगमधली दडपशाही यामुळे चीनवर वंशभेदाचा आरोप जागतिक पातळीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी सांगितलं की, कुठल्याही विदेशी शक्तींच्या दादागिरीला, दबावाला बळी पडणार नाही वा कुणाच्या ताटाखालचं मांजर होणार नाही आणि तसा कोणी प्रयत्न केलाच तर त्यांची डोकी १.४ अब्ज चिनी जनता ठेचेल असा इशारा त्यांनी दिला आहे. तब्बल ७० हजारांच्या संख्येनं उपस्थित असलेल्या चिनी नागरिकांनी जिनपिंग यांच्या या वक्तव्याचं प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.

चीनी लष्कराचं अत्याधुनिकीकरण अत्यंत वेगानं करत असून त्यामुळे शेजारी देशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शी जिनपिंग केवळ चीनचे अध्यक्ष नाहीत तर देशाचं लष्कर ताब्यात असलेल्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचेही अध्यक्ष आहेत.
तैवानचा प्रश्न समूळ सोडवणं आणि त्या प्रदेशाचं चीनमध्ये संपूर्ण एकात्मिकरण करणं ही हे आपल्या पक्षापुढे कधीही विचलित न होणारं ऐतिहासिक कार्य असल्याचं जिनपिंग म्हणाले. लोकशाही असलेलं तैवान आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचा चीनचा दावा असून ते सिद्ध करण्यासाठी चीननं या बेटानजीक लढाऊ विमानं व बाँबर विमानंही धाडली होती. शी जिनपिंग यांचं भाषण हा जगातल्या प्रमुख देशांना या संदर्भात दिलेला इशारा असल्याचं मानण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Xi jinping warns all countries that dont try to dominate us or we will destroy you vsk