गेल्या महिन्याभरापासून तैवानचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे. चीनकडून सातत्याने तैवानवर हक्क सांगण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जात असताना अमेरिकेकडून तैवानला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. चीनविरोधात युद्धात तैवानच्या बाजूने अमेरिका असेल, अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले असून त्यावर आता चीनकडून जग थेट शीतयुद्ध काळात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हा इशारा दिला आहे.

येत्या आठवड्यात शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी केलेलं हे वक्तव्य दोन्ही देशांमधील चर्चेवर परिणाम करण्याची शक्यता आहे. तैवान चीनचाच हिस्सा असल्याची भूमिका जिनपिंग सरकारनं सातत्याने मांडली असताना या भूमिकेला जागतिक स्तरावर विरोध केला जात आहे.

चीनशी युद्ध होणार? “तुम्ही एकटे नाहीत” म्हणत तैवानच्या बाजूने आता युरोपियन युनियनची उडी!

शी जिनपिंग यांचा इशारा

“विचारसरणीच्या आधारावर मतभेदांच्या भिंती उभ्या करणे किंवा जागतिक राजकीय पटलावर छोटे छोटे समूह तयार करण्याचे प्रयत्न अपयशीच ठरणार आहेत. आशिया-पॅसिफिक विभागाने एकमेकांविरोधात उभे राहू नये. अन्यथा पुन्हा शीतयुद्धासारखी परिस्थिती ओढवू शकेल. जग पुन्हा तेव्हासारख्या गटांमध्ये विभागले जाईल”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे. एका ऑनलाईन बिझनेस कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

अमेरिकेचं तैवानला लष्करी मदतीचं आश्वासन!

तैवानच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील संबंध चिघळले आहेत. चीननं तैवानच्या सीमारेषेवर लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेने तैवानला पाठिंबा आणि शक्य ती सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. “तैवानला स्वत:चं संरक्षण करण्याइतपत संसाधनं मिळतील याची आम्ही खात्री करू. कारण या भागात लष्करी शक्तीचा वापर करून अस्थिरता आणण्याच्या पातळीपर्यंत गोष्टी पोहोचू न देणे हा यामागचा हेतू आहे”, अशा शब्दांत अमेरिकेचे गृहमंत्री ब्लिंकन यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे.