ग्रेटर नोएडातील यमुना एक्स्प्रेसवेवर बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेल्या खासगी प्रवासी बसला भीषण आग लागून ९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. सुमारे ३० ते ३५ प्रवासी बसमध्ये होते. आग लागण्यापूर्वी बसमधून जळण्याचा वास येत असल्याची माहिती प्रवाशांनी चालक आणि वाहकाला दिली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

प्रवाशांनी जळण्याचा वास येत असल्याचं सांगितलं

दाखल केलेल्या एफआयआरनुसार, सुनील कुमार हे दिल्लीहून महोबाला जाणाऱ्या ‘राज कल्पना ट्रॅव्हल्स’च्या बसमधून प्रवास करत होते. संबंधित बसचा क्रमांक बीआर ३२ पीए ८६४७ असा होता. रात्री साधारण साडेअकरा वाजता ही बस यमुना एक्स्प्रेसवेवरील नोएडा-आग्रा मार्गाजवळ आली असता, चालकाच्या केबिनमधून काहीसा जळण्याचा वास येत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. याविषयी प्रवाशांनी तातडीने चालक आणि वाहकाला सतर्क केले, परंतु बसमध्ये अशा प्रकारचा वास येणे सामान्य आहे, असे सांगून चालकाने प्रवाशांची चिंता फेटाळून लावली. विशेष म्हणजे, चालकाने बस थांबवून कोणतीही तपासणी करण्याचे टाळले, असा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

चालक-वाहक प्रवाशांच्या विनंतीवर हसत होते?

एफआयआरमधील आरोपानुसार, चालक आणि वाहक केबिनमध्ये बसून सिगारेट ओढत होते आणि काही वेळातच चालकाच्या सीटजवळ अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. त्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड करत बस थांबवण्याची विनंती केली. मात्र, चालक आणि वाहक एकमेकांकडे पाहून हसत होते आणि प्रवाशांनी वारंवार विनवण्या करूनही त्यांनी बस थांबवण्यास नकार दिला, असा प्रवाशांचा आरोप आहे. त्यांनी प्रवाशांना “मरायचं असेल तर मरा, आम्ही बस थांबवणार नाही”, असे म्हटल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, आगीने काही क्षणांतच बसचा मोठा भाग व्यापला आणि प्रवासी भागात धूर पसरला.

खिडकी तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न

बस थांबल्यानंतर सुनील कुमार यांच्यासह काही प्रवाशांनी बसमधून उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रवासी धूर आणि आगीमुळे आतच अडकले. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते काम करत नसल्याचे सांगण्यात आले. बसच्या आतून आवाज ऐकू येत असल्याने खिडकीची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काही प्रवाशांना गंभीर भाजलेल्या अवस्थेत जेवर येथील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील कुमार रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी ९ जणांना मृत घोषित केल्याचे त्यांना समजले.

‘बाहेर पडण्यासाठी जागाच नव्हती’

एका प्रवाशाने सांगितले की, तो बसमध्ये झोपलेला असताना कोणीतरी त्याला उठवून बसला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर तो इतर प्रवाशांबरोबर बाहेर पडला. बसच्या आत मोठ्या प्रमाणात धूर भरल्याने बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. प्रवासी घाबरून मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

दुसरी प्रवासी रिंकी राजपूत नोएडाहून राठ येथे आपल्या घरी जात होती. आग लागली तेव्हा ती झोपलेली होती. कोणीतरी तिला दरवाजा ठोठावून आगीची माहिती दिली. तिने सामान तर सोडाच, पण चप्पलही घातली नाही; फक्त मोबाईल घेऊन ती बाहेर पडल्याचे तिने सांगितले.

दोन चालक आणि वाहक ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी दोन चालक आणि एका वाहकाला ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे पवन कुमार, योगेश दीक्षित आणि रोहित अशी आहेत. तिघेही कानपूरचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. एफआयआरमध्ये चालक आणि वाहकाने प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर चालक आणि वाहक घटनास्थळावरून पळून गेल्याचाही उल्लेख एफआयआरमध्ये आहे.

बसवर अनेक दंड थकीत

या बसच्या कागदपत्रांच्या तपासणीतही अनेक बाबी समोर आल्या आहेत. बसचा मालक मध्य प्रदेशातील छतरपूरचा रहिवासी असून, ती बस ‘राज कल्पना ट्रॅव्हल्स’कडून चालवली जात होती. बसची नोंदणी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात झाली होती.

बसचा मार्ग काश्मिरी गेट-नवी दिल्ली ते महोबा असा होता. तिचे फिटनेस प्रमाणपत्र राजस्थानमधून, तर प्रदूषण प्रमाणपत्र हरियाणातून जारी करण्यात आले होते. या बसवर यापूर्वीही अनेक वाहतूक दंड आकारण्यात आले होते. ७ एप्रिलला परवान्याशिवाय आणि गणवेशाशिवाय एक्स्प्रेसवेवर वेगाने वाहन चालवल्याबद्दल सुमारे सात हजार रुपयांचा दंड झाला होता, तर १९ ऑगस्टला परमिट नसल्याबद्दल १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

याशिवाय बसवर यावर्षी विविध कारणांसाठी आणखी अनेक दंड आकारण्यात आले होते, त्यामुळे या बसची कागदपत्रे, फिटनेस आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबतही तपास सुरू आहे.