नोएडा : दिल्लीतून उत्तर प्रदेशला जाणार्या एका खासगी बसला यमुना द्रूतगती मार्गावर ग्रेटर नोएडा येथे बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे प्रवाशांनी आग लागायच्या आधीच चालक, वाहकाला बसमध्ये जळल्याचा वास येत असल्याची तक्रार केली होती. पण चालकाने बस थांबवण्यास नकार देतानाच ‘मरायचे असेल तर मरा, पण गाडी थांबणार नाही,’ असे उद्धटपणे सांगितल्याचे या दुर्घटनेतून वाचलेल्या एका प्रवाशाने सांगितले. याप्रकरणी चालक आणि वाहकाला पोलिसांनी अटक केली आहे.
‘राज कल्पना ट्रॅव्हल्स’ची ही बस ३५ प्रवाशांना घेऊन दिल्लीच्या काश्मीर गेट येथून उत्तर प्रदेशमधील महोबा येथे जात होती. ३३ किमी अंतर पार केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता चालकाच्या केबिनमधून काहीतरी जळल्याचा वास येत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली. मात्र बस थांबवण्यास चालकाने नकार दिला. त्यानंतर जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसमध्ये आग भडकली. २० प्रवाशांना वाचवण्यात यश आले.
