दिल्लीतील यमुना नदीच्या स्वच्छतेवरून भाजपा आणि आम आदमी पक्षामध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यरोप सुरू झाले आहेत. भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी यमुना नदीत डुबकी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना नदीत स्नान कण्याचे आव्हान दिले होते. त्यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत मनोज तिवारी यांच्याबरोबर ‘स्विमिंग स्पर्धा’ घेण्याची कल्पना मांडली. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

मनोज तिवारींचे राहुल गांधी, केजरीवाल यांना डुबकी मारण्याचे आव्हान

मनोज तिवारी यांनी गुरुवारी यमुना नदीत डुबकी मारतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. “केजरीवालजी आणि राहुल गांधीजी, हे काही खोटं नाही, तर वास्तव आहे. ही दिल्लीची यमुना आहे. आज मी येथे स्नान केले आणि आचमनही केले. केजरीवालजी, राहुल गांधीजी, तुम्ही डुबकी मारायला कधी येत आहात?” असे आव्हान त्यांनी दिले. यमुनेचे पाणी स्वच्छ झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न तिवारी यांच्या या व्हिडीओतून करण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

“मनोजजी, यमुनाचे पाणी आता खूप स्वच्छ झाले आहे. मग आपण दोघांनी येथे पोहण्याची स्पर्धा घेऊ नये का?” असे रिजिजू यांनी तिवारी यांच्या पोस्टला उत्तर देताना म्हटले. दिल्लीतील सुमारे ५२ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना या दोन्ही भाजपा नेत्यांमधील संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.

‘पल्ला ते वजीराबाद’ पट्टा आधीपासूनच तुलनेने स्वच्छ; आपचा दावा

तिवारी यांच्या आव्हानाला आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी यावर प्रत्युत्तर दिले. यमुनेचा पल्ला ते वजीराबाद हा २६ किलोमीटरचा पट्टा आधीपासूनच स्वच्छ असल्याचे त्यांनी म्हटले. आप सरकारच्या काळातही हा भाग अधिक स्वच्छ होता, असा दावा करत त्यांनी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या अहवालांचा संदर्भ दिला.

दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजजवळ वजीराबाद येथे यमुनेत पहिला मोठा नाला मिसळतो. या नाल्यातून दररोज ८६२ दशलक्ष गॅलन सांडपाणी नदीत येते आणि त्यामुळे नदी प्रदूषित होते, असे भारद्वाज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच त्यांनी मनोज तिवारी आणि दिल्लीचे जलमंत्री प्रवेश वर्मा यांना कालिंदी कुंज येथे यमुनेचे पाणी पिण्याचे आव्हान दिले. “मागच्या वर्षीही ते या आव्हानापासून दूर पळाले होते. यंदाही ते तसेच करतील,” असा टोला भारद्वाज यांनी लगावला.

‘यमुना पूर्णपणे स्वच्छ झाल्याचा दावा कधीच केला नाही’

दिल्लीचे जलमंत्री प्रवेश वर्मा यांनी यापूर्वी यमुना नदी पूर्णपणे स्वच्छ झाल्याचा दावा भाजपा सरकारने कधीही केला नसल्याचे स्पष्ट केले होते. यमुना पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी आणखी अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे त्यांनी पीटीआयला सांगितल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील पल्ला ते वजीराबाद हा नदीचा वरचा प्रवाह स्वच्छ करण्यात आला असून, वजीराबाद ते कालिंदी कुंज या भागातील स्वच्छतेचे काम सुरू असल्याचेही वर्मा यांनी म्हटले होते.

यमुना स्वच्छतेसाठी सुमारे ९ कोटी कोटींचे प्रकल्प

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली जल मंडळाच्या सुमारे ९ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यमुना नदीची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन हा या प्रकल्पांचा उद्देश आहे. दिल्ली सरकारने अलीकडेच यमुनेच्या घाटांवर आणि पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांतील ७० ठिकाणी एकदिवसीय स्वच्छता मोहीमही राबवली होती. भाजपा सरकार २०२९ पर्यंत दिल्लीतील यमुनेचा प्रवाह स्वच्छ करेल, अशी ग्वाही अमित शाह यांनी प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी दिली होती.

छठपूजेच्या काळातील पाण्याच्या प्रवाहावरूनही आरोप

सौरभ भारद्वाज यांनी यमुनेच्या स्वच्छतेवरून हरियाणा सरकारवरही आरोप केले. गेल्या वर्षी छठपूजेच्या काळात हथिनीकुंड बॅरेजमधून यमुनेत अतिरिक्त स्वच्छ पाणी सोडण्यास हरियाणा सरकारला सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे नदीतील प्रदूषित गोष्टींचे प्रमाण कमी होते आणि त्यांत भाजपा नेते पामून स्वच्छ झाल्याचा दावा करतात, असा आरोप भारद्वाज यांनी केला.

यमुना नदीच्या स्वच्छतेवरून भाजपा आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मनोज तिवारी आणि किरेन रिजिजू यांच्या ‘स्विमिंग स्पर्धे’च्या टिप्पणीमुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.