पीटीआय, नवी दिल्ली : दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठाप्रकरणी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  न्यायालयाने मलिक याला दहा लाखांचा दंडही ठोठावला. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यांत न्यायालयाने १९ मे रोजी दोषी ठरवले होत़े  यासीनला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वकिलांनी केली होती़  न्यायालयाने नेमलेल्या न्यायमित्रांनी यासीनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची भूमिका विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांच्यापुढे मांडली होती़

यासीन मलिक हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असून, २०१६ मध्ये काश्मीरमध्ये हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका ‘एनआयए’ने त्याच्यावर ठेवला होता़  या आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या ६९ घटना नोंदविण्यात आल्या होत्या.  या प्रकरणी ‘एनआयए’ने मलिकच्या घरावर छापे घातले होत़े त्यात हिजबुल मजाहिद्दीनशी संबंधित काही कागदपत्रे सापडली होती़  काश्मीर खोऱ्यात फुटबॉल स्पर्धा आयोजनापासून दूर राहा आणि कथित स्वातंत्र्य संघर्षांला पाठिंबा द्या, असे आवाहन करणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या पत्राचा त्यात समावेश होता.

 शाबीर शाह, यासीन मलिक, रशीद इंजिनीअर, अल्ताफ फन्टूश, मशरत हे दहशतवादासाठीच्या अर्थपुरवठय़ाचे थेट लाभार्थी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने मार्चमध्ये या प्रकरणात आरोपनिश्चितीवेळी नोंदवले होत़े  मोठय़ा प्रमाणात आंदोलन आणि त्याद्वारे हिंसाचार, विध्वंस घडविण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचेही दिसते, असे न्यायालयाने नमूद केले होते. जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या नावाखाली यासीन मलिक याने बेकायदा आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसे उभे करण्याची यंत्रणा जगभर निर्माण केली, असेही न्यायालयाने म्हटले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मलिक यांनी आपण १९९४ मध्येच हिंसाचाराचा मार्ग सोडून दिल्याचा दावा केला. व्ही. पी. सिंग ते अटलबिहारी वाजपेयीपर्यंतच्या सर्व तत्कालीन पंतप्रधानांची मी भेट घेतली होती, याकडेही मलिकने लक्ष वेधले.

शिक्षेनंतर..

  • न्यायालयाच्या परिसरात मलिकविरोधात घोषणाबाजी
  • काश्मीरमध्ये मलिक समर्थक-सुरक्षा दलांमध्ये संघर्ष. काश्मीरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद
  • शांततेच्या प्रयत्नांना हा धक्का असल्याची गुपकार आघाडीची प्रतिक्रिया
  • मलिकच्या शिक्षेचा पाकिस्तानकडून निषेध

काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद

यासीन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली़  सर्व कंपन्यांनी इंटरनेट सेवा खंडित केली.