सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर तो कोणाचं आयुष्य कसं बदलू शकतो, याचं एक अत्यंत भावूक उदाहरण समोर आलं आहे. तब्बल ९ वर्षांपूर्वी झारखंडमधून अचानक बेपत्ता झालेला एक दिव्यांग तरुण केरळमधील एका संस्थेत राहत होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त शूट केलेल्या एका अवघ्या १० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रीलने या तरुणाचं नशीबच बदललं. ही रील व्हायरल झाली आणि तब्बल २५०० किलोमीटर दूर असलेल्या त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. या रीलमुळे ९ वर्षांचा ताटातुटीचा काळ संपला असला, तरी दुःखाच्या छायेतच ही गळाभेट झाली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
एक स्मितहास्य आणि बदललेलं नशीब
१५ ऑगस्ट रोजी केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील ‘कारुण्यतीरम’ या संस्थेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात एका इन्फ्लुएंसरने हातात तिरंगा घेऊन हसणाऱ्या एका तरुणाचा १० सेकंदांचा व्हिडिओ शूट केला आणि तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. पाहता पाहता या व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका युझरने हा तरुण त्याचा हरवलेला भाऊ असल्याचा संशय व्यक्त केला. व्हिडिओत दिसणारा तोच बिनधास्त चेहरा आणि तेच खास हसू पाहून कुटुंबाला खात्री पटली. ९ वर्षांपूर्वी वयाच्या २६ व्या वर्षी घर सोडलेला हा तरुण आता ३५ वर्षांचा झाला होता.
झारखंडचा ‘यासीन’ केरळमध्ये कसा बनला ‘रशीद’?
२०१७ मध्ये झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील नारायणपूर गावात राहणारा यासीन शेख मित्रांसोबत खेळायला बाहेर पडला आणि अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करून त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीही पत्ता लागला नाही.
दुसरीकडे, तो भटकत भटकत थेट केरळमधील कोझिकोड येथे पोहोचला. स्थानिक लोकांना तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत सापडला. तो स्पष्ट बोलू शकत नसल्यामुळे आणि स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगू शकत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्याला बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. पुढे वय वाढल्यानंतर २०२३ मध्ये त्याला ‘कारुण्यतीरम’ या दिव्यांग आणि विशेष व्यक्तींच्या पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने संस्थेने त्याचे नाव ‘रशीद’ ठेवले होते.
गावाची अन् आईची आठवण छळायची
कारुण्यतीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. आय. नवस यांनी सांगितले, “रशीदला नीट बोलता येत नव्हते, पण त्याला कॅमेऱ्याची खूप आवड होती. संस्थेतील प्रत्येक कार्यक्रमात तो उत्साहाने सहभागी व्हायचा. एका राज्यस्तरीय लघुपटातही त्याने काम केले होते. तो नेहमी त्याच्या आईबद्दल आणि स्वतःच्या गावाबद्दल सांगायचा. त्याला घरी जायचे होते, पण त्याचे घर नेमके कुठे आहे, हे कोणालाच माहीत नव्हते.”
इन्स्टाग्राम रील अन् २५०० किमीचा प्रवास
स्वातंत्र्यदिनी ‘बेलाईकयासीर’ या इन्स्टाग्राम हँडलवरून अपलोड झालेला व्हिडिओ त्याच्या चुलत भावाच्या नजरेस पडला. त्याने लगेच संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे यासीनची त्याच्या वडिलांशी आणि भावांशी भेट घडवून आणली गेली. ओळखीची पुष्टी करण्यासाठी कुटुंबीयांनी त्याच्याशी संबंधित अधिकृत कागदपत्रे आणि तपशील सादर केले. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर केरळ व झारखंड पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला.
आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर
यासीनला परत नेण्यासाठी त्याचा लहान भाऊ अजुल शेख स्वतः केरळमध्ये पोहोचला. तब्बल ९ वर्षांनंतर भाऊ समोर उभा ठाकल्यावर दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. परंतु, या आनंदाच्या क्षणात एक अत्यंत दुःखाची बातमीही यासीनची वाट पाहत होती.
संस्थेत असताना यासीन ज्या आईची आठवण काढून वारंवार रडायचा, ती आई आपल्या मुलाच्या प्रतीक्षेत २०२३ मध्येच हे जग सोडून गेली होती. मुलाला डोळे भरून पाहण्याची तिची इच्छा अपुरीच राहिली. एका बाजूला ९ वर्षांनंतर घराकडे निघाल्याचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला आई गमावल्याचे दुःख, अशा अत्यंत भावूक वातावरणात यासीनचा झारखंडकडे प्रवास सुरू झाला आहे.
