सत्तेवर आल्यापासून सातत्याने परदेश दौरे करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी शुक्रवारी टोला लगावला. गेल्या काही वर्षांपासून परदेशात जायला न मिळाल्यामुळे त्याची कसर भरून काढण्यासाठीच सत्तेवर आल्यापासून मोदी सारखे परदेश दौरे करीत असल्याचे सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे. विशाखापट्टणममध्ये पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका केली.
येचुरी म्हणाले, सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने देशातील जनतेसाठी ठोस असे कोणतेही काम केलेले नाही. ‘स्वच्छ भारत’ हा काही काम केल्याचे उदाहरण असू शकत नाही. सत्तेवर आल्यानंतरही मोदी सातत्याने निवडणुकीच्या मूडमध्ये असतात, अशीही टीका त्यांनी केली.