येस बँकेवर आलेल्या संकटाबाबत बोलताना देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांनी खातेदारांना एक अजब सल्ला दिला आहे. खातेदारांनी घाबरुन जाऊ नये, धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल आहेत, अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे.

सुब्रमण्यम म्हणाले, “जागतिक स्तरावर बँकांचं कॅपिटल टू रिस्क असेट रेशियो (CRAR) ८ टक्क्यांच्या जवळ असतो. तर भारतातील बँकांसाठी CRAR १४.३ टक्क्यांच्या जवळपास आहे. यानुसार, आपल्या बँकांजवळ CRAR जागतीक स्तरापेक्षा ८० टक्के जास्त आहे. आपल्या बँकांचं सेफ्टी मार्जिनही मोठं आहे. त्यांच्याजवळ भांडवलाची कमी नाही. मात्र, खातेदारांच्या हिताबाबत बोलायचे झाल्यास नुकत्याच झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये बँकांचा रिस्क इन्शूरन्स १ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे खातेदारांना घाबरण्याची काहीही गरज नाही. भारतीय बँकिंग क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित आहे आणि खातेदारांचा एक-एक रुपया देखील.”

३ मेपर्यंत ५० हजार रुपये काढता येणार

येस बँकेबाबत बोलायचे झाल्यास ३ मे पर्यंत खातेदारांसाठी पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आपत्कालिन परिस्थितीत ते ५ लाख रुपये काढू शकतात. रविवारी ग्राहकांना बँकेने आणखी एक दिलासा दिला तो म्हणजे आता येस बँकेचे ग्राहक कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतात.

बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी

बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांना शनिवारी रात्री अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर रविवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. दरम्यान, ईडीने त्यांची पत्नी आणि मुलींचीही चौकशी केली. त्यांच्या इतर ठिकाणांवरही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.