scorecardresearch

DHFL Yes Bank Case: अविनाश भोसलेंनी लंडनमध्ये ३०० कोटींची संपत्ती खरेदी केली; CBI च्या आरोपपत्रात उल्लेख

पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत.

CBI Avinash Bhosle
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख (फाइल फोटो)

केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने यस बँक आणि डीएचएफएल प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये अटकेत असलेल्या पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मिळवलेला ३०० कोटींचा निधी लंडनमध्ये संपत्ती विकत घेण्यासाठी वापरल्याचा उल्लेख करण्यात आलाय.

अविनाश भोसले यांना २०१८ साली यस बँकेचे राणा कपूर यांच्या माध्यमातून ७०० कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. याच पौशांमधून भोसले यांनी लंडनमधील फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेतली असून तिची किंमत आता एक हजार कोटी इतकी आहे. आरोपपत्रामधील माहितीनुसार भोसले यांच्या मालकीच्या कंपनीला ६८ कोटी ८२ लाख रुपये हे सल्लागार फी, १८३ कोटी रुपये डीएचएफलकडून कर्ज म्हणून मिळाले. तर कंपनीने स्वत: ३१७ कोटी ४० लाख रुपये हे रेडियस समुहाकडून घेतले.

“तपासामध्ये या एकूण ५६९ कोटी २२ लाख रुपयांपैकी ३०० कोटी रुपये अविनाश भोसले यांनी फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेण्यासाठी वापरले. या संपत्तीची तेव्हाची किंमत ९२.५ मिलियन जीबीपी (ब्रिटीश चलन) इतकी होती. त्यांनी ही संपत्ती युनायटेड किंग्डममधील नोंदणीकृत कंपनी असणाऱ्या फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडच्या माध्यमातून विकत घेतली. या व्यवहारासाठी ७० जीबीपी मिलियनची रक्कम कर्ज स्वरुपात आरोपी राणा कपूर किंवा यस बँक यांनी एप्रिल २०१८ मध्ये फ्लोरा डेव्हलपमेंट्स लिमिटेडला दिली,” असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलंय.

पाहा व्हिडीओ –

तसेच केंद्रीय तपास यंत्रणेनेनं आरोपी कपील वाधवान, धीरज वाधवान, राणा कपूर, संजय राजकुमार छाबरिया, अविनाश भोसले, सत्यन गोपालदास तंडन यांनी एकत्र मिळून यस बँकेची आर्थिक फसवणूक करण्याची योजना बनवण्याचंही आरोपपत्रात म्हटलंय. “२०१८ साली कपील आणि धीरज वाधवान यांनी बेकायदेशीरपणे ४ हजार ७३३ कोटी रुपयांचा निधी हा गुंतवणूक किंवा कर्जाच्या माध्यमातून यस बँककडून डीएचएफएल आणि बिलीफ रिलॅलिटर्स प्रायव्हेट लिमिटीडकडे वळवला. हा पैसा त्यांना बेकायदेशीररित्या वळवण्यासाठी कपूर, छाबरिया आणि भोसले यांच्या कंपन्यांनी मदत केली,” असं आरोपपत्रात म्हटलंय.

हा सर्व पैसा कर्ज, आयसीडी गुंतवणूक किंवा सल्लागार म्हणून देण्यात आसलेल्या फिच्या माध्यमातून वळवण्यात आल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 14:04 IST
ताज्या बातम्या