Yog Guru Ramdev on Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेतील २७४ जणांचा बळी गेला आहे. या विमानातील पायलट, क्रू सदस्यांसह २४१ प्रवासी आणि विमान जिथे कोसळलं त्या रहिवासी भागातील ३३ जण असे मिळून २७४ जण या दुर्घटनेत मरण पावले आहेत. हा विमान अपघात नेमका कसा झाला? याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्धा डझनहून अधिक तपास यंत्रणा या अपघाताची कारणं शोधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत.
दरम्यान, योगगुरू तथा पतंजली कंपनीचे सहसंस्थापक व ब्रॅन्ड अम्बॅसिडर रामदेव बाबा यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. या दुर्घटनेमागे परकीय शक्ती असू शकतात असं मत रामदेव यांनी नोंदवलं आहे. त्यांनी तुर्कीयेकडे बोट दाखवलं आहे.
रामदेव बाबा तुर्कीयेच्या कंपनीवर संशय
रामदेव बाबा म्हणाले, “या दुर्घटनेमागे तुर्कीये असू शकतो असं मला वाटतंय. तुर्कीयेची एक कंपनी या विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं (मेन्टेनन्स व सर्व्हिसेस) काम करत होती. मात्र आता हवाई वाहतूक कंपन्यांना याकडे लक्ष द्यावं लागेल. तुर्कीयेने सूड तर उगवला नसेल ना, त्यांनी कुठला कट तर रचला नसेल ना? असा प्रश्न पडला आहे. कारण त्या कंपनीचं कंत्राट अलीकडेच रद्द केलं होतं. त्यामुळे अशा संवेदनशील कामांमध्ये परदेशी कंपन्यांचा हस्तक्षेप बंद झाला पाहिजे असं मला वाटतं”.
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी विमानतळानजिकच्या मेघानीनगरमधील रहिवासी भागात कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील २४१ प्रवासी आणि १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने काय म्हटलं?
नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले, ते विमान ६५० फूट उंचीवर गेलं होतं. मात्र, त्यानंतर ते विमान खाली आलं आणि अगदी एका मिनिटानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळलं. विमानाच्या पायलटने दुपारी १:३९ वाजता (१२ जून) एटीसीला मे डे कॉल केला होता. एटीसीनुसार जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एका मिनिटात रिप्लाय गेला होता परंतु, समोरून प्रतिसाद मिळाला नाही. काही सेकंदांनी हे विमान कोसळलं. अपघाताच्या काही तास आधी या विमानाने पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद असा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला होता”.