पाकीटबंद पदार्थांच्या गुणवत्तेबाबत चिंता निर्माण करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम युजर जोहाना हिने ‘योगा बार हाय प्रोटीन ओट्स’च्या ‘डार्क चॉकलेट’च्या पाकीटात हालचाल करणारे काही जीव आढळल्याचा दावा केला आहे. व्हिडीओमध्ये ती ओट्सचं पाकीट दाखवताना दिसते. हे ओट्स आपण काही काळापासून खात असल्याचं तिने सांगितलं. मात्र, अचानक घशात काहीतरी वेगळं जाणवल्यानंतर पाकीटात पाहिलं असता काही हालचाल करणारे जीव दिसल्याचा तिचा दावा आहे.
‘मी किती खाल्ले असतील माहीत नाही’
व्हिडीओमध्ये जोहाना म्हणते की, ओट्स खात असताना तिला घशात काहीतरी विचित्र असल्याचं जाणवलं. त्यानंतर तिने लक्षपूर्वक पाहिले असता, ओट्सच्या पाकीटात तिला काही हालचाल करणारे जीव दिसले. हे दृश्य पाहिल्यानंतर, आपण यापूर्वी नेमके किती ओट्स खाल्ले असतील, या विचाराने तिला चिंता वाटू लागली. “मी आधी किती ओट्स खाल्ले आहेत मला माहीत नाही, पण आता माझ्या घशात काहीतरी सरपटत असल्यासारखे मला वाटतेय,” असा भीतीदायक दावा तिने या व्हिडिओमध्ये केला आहे.
दरम्यान, या व्हिडिओत दिसत असलेले ते जीव नेमके काय आहेत, याबाबत अद्याप कोणतीही स्वतंत्र पुष्टी झालेली नाही, मात्र सोशल मीडियावर युजर्सकडून त्यांना ‘अळ्या’ असल्याचे म्हटले जात आहे.
‘पाकीट सीलबंद आणि व्यवस्थित होतं’
जोहानाने उत्पादनाच्या पाकीटावरील सूचनांचाही व्हिडीओमध्ये उल्लेख केला. पाकीट उघडल्यानंतर उत्तम गुणवत्तेसाठी ३० दिवसांच्या आत उत्पादन वापरण्याचा सल्ला दिला असल्याचं ती म्हणाली. तसेच पॅकेजिंगमध्ये छेडछाड झाल्यास उत्पादन वापरू नये, अशी सूचनाही असल्याचं तिने दाखवलं.
तिच्या म्हणण्यानुसार, तिने हे पाकीट खरेदी केलं तेव्हा ते सीलबंद आणि व्यवस्थित होतं. पाकीट उघडून सुमारे ४० दिवस झाले होते, मात्र आपण हे चॉकलेट ओट्स अधूनमधूनच खात असल्याचं तिने स्पष्ट केलं.
‘३० दिवसांनंतरही असं व्हायला नको’
पाकीटावर ३० दिवसांच्या आत वापरण्याची सूचना असली तरी त्यानंतर उत्पादनात असे जीव आढळणं स्वीकारार्ह नसल्याचं जोहानाने म्हटलं. ओट्सचा वापर अनेकजण प्रोटीनयुक्त नाश्त्यासाठी करत असल्याने आपल्याला या प्रकाराची चिंता वाटली आणि नेमकं कोणाशी संपर्क साधावा हे कळत नसल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं तिने सांगितलं.
व्हिडीओ शेअर करताना तिने, “योगा बार????? तुम्ही तुमच्या ग्राहकांना हेच खायला देता का?” असं कॅप्शन दिलं.
कमेंट्समध्ये इतर युजर्सचेही दावे
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये काही युजर्सनी चिंता व्यक्त केली, तर काहींनी ‘योगा बार’च्या ओट्सबाबत असेच अनुभव आल्याचा दावा केला.
एका युजरने आपणही ‘योगा बार’च्या उत्पादनात असाच प्रकार पाहिल्याचं सांगत कंपनीने कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा केला. आणखी एका युजरने काही महिन्यांपूर्वी नवीन आणि एक्सपायरी न झालेल्या पाकीटातही अशाच प्रकारे अळ्या आढळल्याचा दावा केला. मात्र, या कमेंट्समधील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
कंपनीकडून अद्याप सार्वजनिक स्पष्टीकरण नाही
जोहानाने केलेल्या या आरोपावर अद्याप ‘योगा बार’कडून सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचं उपलब्ध माहितीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्पादनात नेमकं काय आढळलं, त्याचा स्रोत काय होता आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत प्रत्यक्षात काही त्रुटी होती का, हे अधिकृत स्पष्टीकरण किंवा तपासानंतरच स्पष्ट होऊ शकतं.
