योगा एक्स्प्रेसमध्ये चढत असताना सहप्रवाशांनी केलेल्या हल्ल्यात एका ३५ वर्षीय माणसाचा मृत्यू झाला. दिल्लीतील शाहादरा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. पंकज धामा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पंकज धामा हे आय. पी. एक्स्टेंशन मेट्रो स्थानकावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. एक्स्प्रेसमध्ये चढत असताना धामा यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. धामा दरवाजा अडवून बसले होते असा आरोप करत या प्रवाशांनी हल्ला केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांनी पंकज यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पंकज यांना खूप दुखापत झाली. ज्यानंतर त्यांना गुरु तेज बहाद्दुर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी पंकज धामा यांना मृत घोषित केलं. पंकज यांच्या मृत्यूनंतर धामा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शनिवारी सकाळी साधारण पाच वाजता पंकज धामा हे बागपत या ठिकाणी जाण्यासाठी शाहादरा स्टेशनवर पोहचले. योग एक्स्प्रेसने घरी जायचं हे त्यांनी ठरवलं होतं. मात्र ट्रेनमध्ये चढताना धक्काबुक्की झाली आणि काही प्रवाशांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर आठ ते दहा प्रवाशांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी घटनास्थळी जीआरपीचा जवानही उपस्थित होता. जो हल्ला झाला त्यानंतर पंकज धामा हे प्लॅटफॉर्मवरच कोसळले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी आठ पथकं तयार करण्यात आली. मुजफ्फर नगर, ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी छापेमारी करुन जीआरपीने आरोपींना ताब्यात घेतलं. आता त्यांची चौकशी करण्यात येते आहे. हे सगळे आरोपी शाहदराचे रहिवासी आहेत असं पोलिसांनी म्हटलं आहे तसंच ते हरिद्वारला फिरायला चालले होते अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

पंकज धामा यांना जी मारहाण करण्यात आली त्यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जीआरपीचे जवान हे हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर पंकज यांचाच हात पकडताना दिसत आहेत, जेव्हा पंकज धामा हे प्लॅटफॉर्मवर कोसळले तेव्हा त्यांना उठवलं गेलं नाही उलट त्यांचा हात पकडून त्यांना प्लॅटफॉर्मवर फरपटत नेलं असंही या व्हिडीओत दिसतं आहे. प्रत्यक्षदर्शींनी हा आरोप केला आहे की पंकज यांना जर जवळच्या रुग्णालयात नेलं असतं आणि प्रथमोपचार केले असते तर त्यांचा जीव वाचला असता. पंकज यांचे वडील राजेंद्र सिंह धामा हे आता पंकज यांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले आहेत. पंकज यांच्यामागे त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असं कुटुंब आहे.