अभिनेत्री कंगना रणौत यांच्याबाबत योगगुरू रामदेवबाबांनी हरिद्वारमध्ये एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत यांना पोस्टाद्वारे भेटवस्तू आणि मिठाई पाठवणार असल्याचे सांगितलं आहे. एवढंच नाही तर आमची बहीण कंगनाला फोन करुन राखीच्या शुभेच्छा देणार असल्याचंही म्हटलं आहे. देशात कोणत्याही कारणाने द्वेष पसरू नये आणि लोकांमध्ये आपापसात वैर निर्माण होऊ नये, असा संदेश त्यांनी आज दिला.
रामदेवबाबा काय म्हणाले?
रामदेवबाबा म्हणाले, आमची बहीण कंगना रणौतला आम्ही गिफ्ट आणि मिठाई पोस्टाने पाठवत आहोत. कुठल्याही कारणाने देशात तिरस्कार, वैरभाव कुणाचंही भलं करत नाही. आता लोक म्हणत आहेत की रामदेवबाबा आणि कंगना यांच्यात वाद झाला आहे. पण वाद झाला असेल तर आम्ही तो संवादातून संपवू. आज आम्ही कंगनाला फोन करु आणि राखी पौर्णिमेच्या शुभेच्छाही देऊ. असं विधान करत रामदेवबाबांनी वादावर पडदा टाकला आहे. IANS या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यातील शाब्दिक युद्ध पेटलं होतं. दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांच्या भाषेवर आणि वर्तनावर कंगनाने आक्षेप घेतला होता. तिने त्या आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ म्हटले होते. तिच्या या वक्तव्यानंतर देशभरातून जोरदार टीका झाली. जेन झीवर तिने टीका केल्याने तिच्यावर रामदेवबाबांनीही टीका केली होती.
रामदेवबाबा काय म्हणाले होते?
रामदेव यांनी कंगनावर टीका केली होती. कंगनाचे वक्तव्य म्हणजे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा बाबा रामदेव यांना कंगनांच्या ‘गटर छाप’ विधानाबद्दल विचारण्यात आले. “कंगनाची पात्रता काय आहे? तिचे बालपण कसे गेले? तिचे तरुणपण कसे गेले आहे? तिची पूर्वीची कामगिरी काय आणि कशी राहिली आहे? मला अशा लोकांबद्दल बोलायचे नाही. देशातील अशा कोणत्याही तरुणांना आणि Gen Z ला गटर-पटर बोलणे, हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, चुकीची गोष्ट आहे. यावर तिच्या पक्षातील लोकांनी दखल घेतली पाहिजे,” अशी टीका बाबा रामदेव यांनी केली होती.
रामदेवबाबांना कंगना काय म्हणाली होती?
या टीकेला कंगनाने इन्स्टाग्रामवरुन प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली होती, “बाबा जी, माझं तारुण्य किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्नं पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गप्पांच्या आधारावरच अंदाज लावू शकते. किमान मला कधीही सर्वोच्च न्यायालयाकडून खोट्या आणि फसव्या वैद्यकीय दाव्यांसाठी फटकारले गेले नाही, जे पक्क्या तथ्यांवर आधारित आहेत, कोणत्याही अंदाजावर नाही. त्यामुळे चारित्र्याबद्दल मला शिकवू नका, तुमच्यापेक्षा माझे चारित्र्य खूप चांगले आहे, माझ्यावर कोणताही फसवणुकीचा आरोप लागलेला नाही,” अशी टीका कंगनाने केली होती. मागचे तीन ते चार दिवस हा वाद सुरु होता. ज्यावर आता रामदेवबाबांनी पडदा टाकला आहे.
