देशात करोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अनलॉकचा निर्णय घेत केंद्र सरकारनं जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू असताना देशातील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असून,”नियमित योग करणाऱ्यांना व्यक्तींना करोना होण्याचा धोका खूप कमी आहे”, असा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.

रविवारी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. करोना असल्यामुळे घरातच योग करून हा दिवस साजरा करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं होतं. रविवारी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘पीटीआय’शी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारतात व जगात योग प्रसार करण्यात आला. त्याचा मोठा फायदा करोनावर मात करण्यासाठी होत आहे. ज्या व्यक्ती नियमित योग करतात, त्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे”, असा दावा नाईक यांनी केला.

नाईक यांनी पणजीजवळील त्यांच्या गावी योग दिवस साजरा केला. “योग केल्यानं रोग प्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर श्वसन संस्थाही सदृढ होते. योगामुळे करोनासारख्या आजाराला रोखण्यासाठी मदत होते. घरी राहून योग करण्याच्या सरकारच्या आवाहनालाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असं नाईक यांनी सांगितलं.”, असं नाईक यांनी सांगितलं.

योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना योग करण्याचं आवाहन केलं होतं. “करोनाचं संकट उभं राहिल्यानंतर जगाने योगाला गांभीर्यानं घेतलं आहे. त्यामुळे भारतीयांनी योगाला दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं,” असं मोदी म्हणाले होते. यावर्षी योग दिनाची थीम योगा अॅट होम, योग विथ फॅमिली अशी होती.