नवी दिल्ली : ‘एसआयआर’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार हे आधीच ठरले होते, असे म्हणत ‘एसआयआर’ला आव्हान देणार्या याचिकाकर्त्यांपैकी एक असलेले राजकीय कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता कोणी मत द्यायचे आणि कोणी नाही, याचा निर्णय भाजप घेणार असल्याचा आरोपही यादव यांनी केला.
या खटल्याचा मुद्दा न्यायालयाने ‘एसआयआर’च्या घटनात्मक वैधतेवरून मतदारांच्या तक्रारींचे निवारण आणि लवाद प्रक्रिया यावर केंद्रित केला, अशी नाराजी यादव यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील ‘एसआयआर’ प्रक्रियेचा निवडणूक आयोगाचा अधिकार वैध ठरवल्यानंतर यादव यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट लिहून निकालाबद्दल आपले मत व्यक्त केले. ‘‘निकाल ऐकण्यासाठी आपण आज न्यायालयात गेलो नाही, कारण निकाल काय दिला जाणार हे आधीच निश्चित झाले होते,’’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
विरोधकांची असहमती, भाजपकडून स्वागत
‘एसआयआर’संबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर काँग्रेसने असहमती दर्शविली, तर भाजपसह सत्ताधारी पक्षांकडून स्वागत करण्यात आले. कायदेशीर मंजुरीमुळे एसआयआरला वरवरची वैधता मिळू शकते, परंतु त्यामुळे अंमलबजावणीतील दुष्ट हेतू दूर होऊ शकत नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही या निकालावर नापसंती दर्शविली.
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत केले आणि विरोधी पक्षांवर नागरिकांची दिशाभूल करण्याचा आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. राहुल गांधी आणि काँग्रेसने सुरुवातीपासूनच एसआयआरला विरोध केला. कारण ते भारतीय मतदारांच्या नव्हे तर बेकायदा घुसखोरांच्या बाजूने उभे आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले.
