Yogendra Yadav Neha Bora Detained Jantar Mantar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननेही पाठिंबा दिला असून AISAच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह स्वराज इंडियाचे सदस्य योगेंद्र यादव यांनाही ताब्यात घेतलं आहे.

दुसऱ्या दिवशी काय घडलं?

२ ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशीही ५५० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये नेहा बोरा आणि योगेंद्र यादव यांचाही समावेश होता. तर, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी, आंदोलनकर्ते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलनासाठी जमा झाले होते आणि त्यांनी जंतरमंतरच्या दिशेने मोर्चा काढण्यास सुरुवात केली होती.

जंतर मंतर येथे अडवलं अन्…

बोरा, यादव आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांसोबतच या आंदोलनात राज्यसभा खासदार कपिल सिबल आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे देखील सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्सचा पहिला टप्पा पार केला, परंतु पोलिसांनी त्यांना जंतरमंतर रोडजवळ अडवलं आणि बसमध्ये बसवून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलं जात असताना नेहा बोरा आणि इतर आंदोलक घोषणाबाजी करताना दिसले.

दरम्यान, शुक्रवारी जंतर मंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निदर्शन करण्याच्या प्रयत्नांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध तीन एफआयआर दाखल केले आहेत. दोन एफआयआर पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणि एक कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत जमावबंदी लागू

जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्याचे दोन दिवसांपासून प्रयत्न होत असतानाच, मध्य दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नवी दिल्ली जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, सुमारे ५ हजार पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, तसंच ठिकठिकाणी बहुस्तरीय बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. शुक्रवारच्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तीन एफआयआर (FIR) नोंदवले आहेत. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यावर गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि समान हेतूने एकत्रित येऊन कृत्य करणे या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.