Yogendra Yadav, Neha Bora Detained Delhi Police Protest: निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेला विरोध दर्शवत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या ६० हून अधिक जणांमध्ये राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या नेत्या नेहा बोरा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज आणि ‘भाकप (एम)’चे नेते दीपांकर भट्टाचार्य यांचा समावेश आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी जंतरमंतर येथे एकत्र येण्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. शिवाय नवी दिल्ली परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करणारे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले होते.

या आंदोलनाची हाक ‘आयसा’ या विद्यार्थी संघटनेने दिली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच जंतरमंतर परिसराभोवती बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलक संसद मार्गाजवळ जमा होऊ लागताच पोलिसांनी त्यांना जंतरमंतरच्या दिशेने पुढे जाण्यापासून रोखले.

पोलिसांनी ताब्यात घेताना ‘आयसा’च्या नेत्या नेहा बोरा यांनी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, “निवडणूक आयुक्त आणि भाजपा सरकार यांच्यात अशी देवाणघेवाण चालू शकत नाही. निवडणूक आयुक्त भाजपाला निवडणुका जिंकून देण्यात मदत करतात आणि सत्तेवर आल्यानंतर दिल्ली पोलीस भाजपाच्या सांगण्यावरून निवडणूक आयुक्तांचे रक्षण करतात; हा प्रकार आता सहन केला जाणार नाही.”

दरम्यान, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भाजपामधील साटेलोटे आता उघड झाले आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ते कदाचित ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग रोखू शकतील, मात्र आता जनताच रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारेल,” असा इशारा यादव यांनी दिला.

ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी बसमधून उत्तर आणि वायव्य दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांची सुटका करण्यात आली.