योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे दोघेजण दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्नशील होते, असा आरोप पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपमध्ये निर्माण झालेली अशांतता शमण्याची चिन्हे दिसत नाही. त्यातच रोज पक्षातील वेगवेगळे नेते आरोप-प्रत्यारोप करीत असल्यामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते मनिष सिसोदिया, गोपाल राय, पंकज गुप्ता आणि संजय सिंग यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये यादव आणि भूषण यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून का हाकलण्यात आले, याची कारणे देण्यात आली आहे. याच निवेदनामध्ये हे दोघेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न करीत होते, असा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांनीसुद्धा अशाच स्वरुपाचा आरोप केला होता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाचे कार्यकर्ते विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच पक्षाचे तीन नेते यादव, प्रशांत भूषण आणि शांतीभूषण हे पक्षाला अपयश कसे येईल, याचे नियोजन करीत होते, असा आरोप या चारही नेत्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.