Yogendra Yadav RSS afraid of BJP Strategy in LokSabha : "भारतीय जनता पार्टी ही आता स्वयंपूर्ण झाली आहे आणि आम्ही आमचा कारभार स्वतंत्रपणे करतो. सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची आवश्यकता भासत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत", असं वक्तव्य भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतंच केलं होतं. यावर 'स्वराज्य भारत’चे संस्थापक व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाष्य केलं आहे. ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात त्यांनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधांवर व अंतर्गत बाबींवर प्रकाश टाकला. जे. पी. नड्डांच्या वक्तव्याबाबत योगेंद्र यादव म्हणाले, "मी भाजपा किंवा संघातील संबंधांवर अभ्यास केलेला नाही किंवा मी या गोष्टी फार जवळून कधी पाहिल्या नाहीत. परंतु, मला काही गोष्टी माहित आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्या राज्यातून संघाला नामशेष करून टाकलं होतं. गुजरातमधील संघाचे लोक नरेंद्र मोदींबद्दल किंवा भाजपाबद्दल फार चांगलं बोलताना दिसत नाहीत. कारण मोदींनी संघाला तिथल्या राजकारणापासून पूर्णपणे बाजूला सारलं होतं. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदूराष्ट्र हवं आहे. त्याचबरोबर बहुमतही हवं आहे. परंतु, एककेंद्री सत्ता नको आहे आणि नरेंद्र मोदी नेमकं तेच करत आहेत. हे ही वाचा >> RSS शी संबंधित ‘पांचजन्य’मधून जातीव्यवस्थेचं समर्थन; थेट अग्रलेखातून मांडली सविस्तर भूमिका संघाला भाजपाची भिती? योगेंद्र यादव म्हणाले, "माझ्या माहितीनुसार संघ व भाजपातील काही पक्क्या सूत्रांनुसार लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संघ बहुमताबद्दल गंभीर होता, भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. त्यामुळे संघालाही भाजपाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणं नको होतं. दरम्यान, निवडणुकीच्या काळात मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एक माणूस भेटला. त्याने मला सांगितलं की तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. तो माणूस मला म्हणाला, 'तुम्ही काहीही करा, परंतु या देशात विरोधकांना मजबूत करा. तुमच्यासारखे लोकच हे करू शकतात.' संघाची ही भूमिका खूप गंभीर आहे. संघातील एका व्यक्तिला नव्हे तर अनेकांना असंच वाटतं." हे ही वाचा >> Yogendra Yadav On Congress: काँग्रेसचं भवितव्य कशावर अवलंबून आहे? योगेंद्र यादव यांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्षाला नव्याने…” परवानगीशिवाय जे. पी. नड्डा तसं वक्तव्य करणार नाहीत : यादव भाजपाच्या ४०० पारची संघालाही भिती होती, यात शंका नाही लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या टप्प्यानंतर याबाबत ते अधिक गंभीर झाले होते. या काळात संघाने भाजपाला सहकार्य केलं. परंतु, पूर्ण ताकदीनिशी व तीव्रतेने त्यांनी पक्षाचं काम केलं नाही. राहिला प्रश्न जे. पी. नड्डा यांनी केलेल्या वक्तव्याचा, तर त्यांना वरून आदेश आल्याशिवाय किंवा तशी परवानगी मिळाल्याशिवाय ते असं वक्तव्य करणार नाहीत.