उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. त्यामुळे योगी सरकारवर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली. मात्र, या टीकांना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले आहे.

भाजपचा कैराना आणि नूरपूर या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. मात्र विरोधकांनी एकत्र येऊन आघाडी केली असली, तरीही आम्ही त्यांच्या आघाडीला घाबरत नाही, असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. इटावा येथील एका रॅलीला ते संबोधित करत होते.

या वेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधक हे नक्षलवादाला पाठिंबा देत आहेत. तसेच विरोधकांनी त्याच्या काळातील सरकारमध्ये भ्रष्टाचार केला आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेता सर्व विरोधक हे पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात एकत्र येत आहेत. पण त्याच्या या आघाडीला आम्ही घाबरत नाही, असे आदित्यनाथ म्हणाले.

काँग्रेस पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही पक्षांनी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग केला आहे. पण आम्ही मात्र असे काही करत नाही. आम्ही आमचे लक्ष केवळ विकासाच्या राजकारणावर केंद्रित केले असून संधीसाधू पक्षांच्या आघाडीला आम्ही अजिबात घाबरत नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.