निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत भगवान हनुमानाला दलित आदिवासी म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य राजस्थान ब्राह्मण सभेला रुचलेले नाही. ब्राह्मण सभेने भगवान हनुमानांना जातीमध्ये विभागण्याचा आरोप करत योगी आदित्यनाथ यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

दुसरीकडे भाजपाने योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याबाबत हात वर केले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंबंधी प्रश्न विचारला असताना त्यांनी गुळगुळीत उत्तर देत त्यांनी काँग्रेसला उत्तर देण्यास सांगितले असेल, असे म्हटले. तर काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी मतासाठी लोक जातीलाही सोडत नसल्याची टीका केली होती.

योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत भगवान हनुमान दलित आदिवासी होते असे म्हटले होते. भगवान हनुमानाच्या जातीच्या मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मत द्यावे असे आवाहनही त्यांनी केले होते. भाजपाच्या हिंदुत्ववादी नेत्यांमधला एक प्रखर चेहरा अशी ओळख असलेल्या योगींनी रावणभक्तांनी मात्र काँग्रेसला मत द्यावे अशी पुस्ती जोडली होती.

अलवरमधल्या सभेत बोलताना योगींनी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी वरील दाखला दिला होता. हनुमान आदिवासी होते, वनवासी होते आणि शोषित होते. बजरंग बलींनी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत व पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतच्या सगळ्या भारतीय समाजाला जोडण्यासाठी काम केले. प्रभू रामांची ही इच्छा बजरंग बलींने केले, आपणही ही इच्छा पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेता कामा नये असे योगी म्हटले होते.