Yogi Adityanath Namaz on Roads: “नागरिकांनी नियंत्रित पद्धतीने नमाज पठण करावे”, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांंनी केले. राज्यात रस्त्यावर नमाज पठण होत नाही, असेही मुख्यमंंत्री म्हणाले. अधिक संख्या असल्याने ते शक्य होणार नाही असाही अनेकांनी युक्तिवाद केला त्यावर शिफ्टमध्ये नमाज पठण करण्याची कल्पना सुचवल्याचे आदित्यनाथ म्हणाले. “प्रेमाने सांगून ऐकल्यास ठिक नाहीतर दुसऱ्या पद्धतीचा वापर करणार”, असा इशाराही आदित्यनाथ यांनी दिला.

शिफ्टमध्ये नमाज पठण करण्याचा सल्ला

लखनऊमध्ये सोमवारी (१८ मे) आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर नमाज पठण होत नाही का? असं मला लोक विचारतात. अजिबात होत नाही असं मी त्यांना सांगतो. रस्ते चालण्यासाठी आहेत. रस्त्यावर नमाज पठण करुन काय दाखवत आहोत आपण? दळणवळणाला का अडथळा निर्माण करण्याचा अधिकार कोणी दिला?, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. प्रार्थनास्थळांवर नमाज पठण करावे, आमची संख्या अधिक आहे मग कसं शक्य होईल? असाही अनेकांनी प्रश्न विचारला यावर शिफ्टमध्ये नमाज पठण करण्यास त्यांना सांगितले असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

“प्रेमाने ऐकलं तर ठिक नाहीतर…”- योगी आदित्यनाथ

“घरात राहण्यासाठी जागा नसताना विनाकारण का संख्या वाढवली जात आहे, त्यावर नियंत्रण ठेवा. शिफ्टमध्ये नमाज पठण केल्यास त्याला आम्ही रोखणार नाही. पण, रस्त्यावर नमाज पठण करु दिले जाणार नाही. सरकारी नियम सर्वांसाठी समान आहे. रस्त्यावर अराजकता माजू देणार नाही, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले. प्रेमाने ऐकलं तर ठिक नाहीतर दुसरा मार्ग अवलंबणार. संवाद करणे आमचे काम आहे. संवादाने समजून घेतले तर संवाद नाहीतर संघर्ष,” असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. “बरेलीत बळाचा वापर करण्यात आला, त्यांनी बघितली ताकद”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यूपीची प्रगती

राज्यात मागच्या सरकारमध्ये कट्टा आणि बॉम्बचे उत्पादन होत होते, पण आम्ही हे उत्पादन बंद केले. उत्तर प्रदेशमध्ये आजच्या घडील ब्राम्होस क्षेपणास्त्र तयार केले जात आहे. शेतीत वापरासाठी तयार होणारे ड्रोन, उद्योग क्षेत्रात वापरासाठी निर्माण केले जाणारे ड्रोन किंवा एखाद्या पाकिस्तानी विमानतळाला टार्गेट करणारा ड्रोन आता उत्तर प्रदेशमध्ये तयार केले जात आहेत. राज्यातील महिला भयमुक्त झाल्याचा दावा देखील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला.