पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सामाजिक तेढ निर्माण करून त्यावर राजकीय पोळी भाजली जात असल्याचा आरोप नेहमीच उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्षांवर केला जातो. भाजपावर देखील यावरून टीका केली जाते. त्यासंदर्भात एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

मुलाखत सुरू असताना न्यूज अँकरनं योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या सरकारवर होत असलेल्या आरोपांविषयी विचारणा केली. उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या नावाने मुस्लमिमांना घाबरवलं जातं, आम्हाला मत द्या नाहीतर योगी (आदित्यनाथ) येतील असं सांगितलं जात असल्याचं न्यूज अँकरनं म्हणताच योगी आदित्यनाथ यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

“कायदा पायदळी तुडवला तर…”

“माझ्या नावावर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. जो कुणी कायद्याचं पालन करेल, काद्याच्या राज्यावर ज्याचा विश्वास असेल त्याला अत्यंत सन्मानाने आणि गौरवाने उत्तर प्रदेशमध्ये राहाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कुणी कायदाच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कुणीही असला तरी त्याच्यावर कायदा कारवाई करेल”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“अब्बाजान, चचाजानच्या अनुयायांना मी सांगून ठेवतो की…”, योगी आदित्यनाथ यांचा ओवैसींना इशारा!

“…त्यांच्यावरच पळ काढण्याची वेळ आली आहे”

दरम्यान, यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील आधीच्या सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं. “जे कायदा पायदळी तुडवत होते, उत्तर प्रदेशमध्ये दंगली घडवत होते, आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण झाले होते, व्यापाऱ्यांसाठी धोका ठरले होते, उत्तर प्रदेशमधल्या लोकांना पळायला लावत होते त्यांच्यावरच गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून पळ काढण्याची वेळ आली आहे. जर कुणी याला जातिधर्माशी जोडू पाहात असेल, तर ते त्यांचं मत असेल, उत्तर प्रदेशच्या सामान्य रहिवाशांचं नाही”, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.