राज्यातील करोना परिस्थितीची जिल्ह्यांनुसार तपासणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना भेट देणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी मुजफ्फरनगरमध्ये होते. त्यांनी करोना नियंत्रण कक्षापासून आरोग्य विभागाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली. विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा आरोप करताना योगी यांनी, करोना संकटाच्या काळात लोकांना धीर देणं आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे त्यावेळेस विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवण्याचं काम करतायत, असं म्हटलं आहे.

या साथीच्या रोगाच्या कालावधीमध्ये काही लोकांनी जनतेला धीर देऊन त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप योगींनी विरोधी पक्षांबद्दल बोलताना केला. विरोधी पक्षांनी भीती दाखवल्यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करु लागले आणि सर्वजण घाबरुन गेले, असा दावाही योगींनी केला. उत्तर प्रदेशमध्ये ३०० ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. मुजफ्फरनगरमध्येही सहा ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यात येणार आहेत. येथे चार प्लॅण्ट आधीपासूनच कार्यरत आहेत, असंही योगींनी सांगितलं.

नक्की वाचा >> गोरखपूर मंदिरात योगी आदित्यनाथांनी केला रुद्राभिषेक; पंडित म्हणाले, ‘यामुळे करोनाचा नाश होईल’

तिसऱ्या लाटेची तयारी सुरु

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना योगींनी, राज्य सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती दिली. आम्ही आतापासूनच करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरु केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. मात्र सर्वांनी या परिस्थितीमध्ये धीर धरणं गरजेचं आहे, असं योगी म्हणाले आहेत.

सर्वाधिक चाचण्या उत्तर प्रदेशात

योगी यांनी देशामध्ये सर्वाधिक करोना चाचण्या करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये साडेचार कोटी चाचण्या करण्यात आल्याचं योगींनी म्हटलं आहे. गावांमध्येही ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट या पद्धतीने काम सुरु आहे. लसीकरणही मोठ्या संख्येनेही सुरु करण्यात आलं आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यामध्ये प्रादुर्भाव कमी होत आहे, असं योगी म्हणाले. तसेच समाजातील गरीब घटकांसाठी कम्युनिटी किचनची सेवा सुरु करण्यात आलीय. गरीबांना मोफत धान्य देण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.