पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपा नेते काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये विकासकामांचं उद्घाटन केलं, यावेळी त्यांनी काँग्रेस ही भारतातील दहशतवादाची जननी आहे आणि ते भगवान राम यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचा अपमान करतात, अशी खरमरीत टीका केली. “देशाला दुखावणाऱ्या लोकांना देशवासियांना सहन करण्याची गरज नाही. काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. तसेच ते प्रभू रामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा अपमान करून माफियांना आश्रय देते. तर याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

“रोग, बेरोजगारी, माफिया राज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी राज्याला काय दिले? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, विभाजनाच्या राजकारणाला स्थान नाही. २०१७ पूर्वी प्रत्येकाला रेशन मिळत होतं का? पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणत असत त्यांनी गरिबांचे रेशन पचवले,” अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील जनतेने प्रभू रामाच्या भक्तांवर गोळी झाडणारी तालिबान समर्थक, जातीयवादी आणि वंशवादी मानसिकता सहन करू नये. मोदीजींनी देशात तिहेरी तलाक रद्द केला. पण समाजवादी पक्षाचे नेते तालिबानच्या कृत्यांना पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानचं समर्थक करणाऱ्या देशातील दहशतवाद्यांना आज कुठेही स्थान नाही, असंही आदित्यनाथ यांनी सुनावलं.

“हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता. इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला आणि सोनिया गांधींनी रामाचे अस्तित्व नाकारले,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.