Yogi Adityanath on 1947 Partition: १९४७ साली झालेली भारताची फाळणी आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. “जर स्वातंत्र्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर भारताचे इतके नुकसान झाले नसते”, असेही विधान योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. ‘विभाजन की विभीषिका (१९४७)’ या विषयावर लखनऊ मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, जर स्वातंत्र्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचे तुकडे झाले नसते. काँग्रेसच्या सत्तेच्या हव्यासापोटी आणि त्यांच्या निर्णयामुळे देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली, असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.
सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते तर…
फाळणी आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराला काँग्रेसला जबाबदार ठरवत योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यावेळी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असते तर भारताचे किंचितही नुकसान करण्याची कुणाची हिंमत झाली नसती. तसेच सरदार वल्लभभाई पटेल जर त्यावेळी पंतप्रधान असते. तर भारताचे तुकडे करणे कुणालाही शक्य झाले नसते. काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्याडपणाची देशाला मोठी किंमत मोजावी लागली. काँग्रेसचे हे चारित्र्य सर्वांनी सीएएच्या आंदोलनादरम्यान पाहिले.”
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, १९४७ साली पाकिस्तानला असा भूभाग मिळाला जो त्यांनी कधीही मागितला नव्हता. हिंदूबहुल आणि सिंधी लोकसंख्या प्रामुख्याने असलेला भूभाग पाकिस्तानला बळजबरीने देण्यात आला. तसेच पंजाबींचे प्राबल्य असलेला पंजाबचाही भाग पाकिस्तानला देण्यात आला.
बंगालचे उदाहरण देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, बंगालमध्ये बंगाली जनतेचे प्राबल्य होते. हिंदूंची गावे बळजबरीने बांगलादेशला देण्यात आली. सत्तेसाठी आतूर असलेल्या काँग्रेसने हे लाजिरवाणे कृत्य केले. त्यांनी विश्वासघात करत देशातील जनतेचा विश्वास मोडला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना काँग्रेसने मौन बाळगले होते, असाही आरोप त्यांनी केला.
बांगलादेशमधील हिंसाचारावर जर काँग्रेस व्यक्त झाली असतील तर त्यांची मतपेटी हिरावली जाऊ शकते, अशी भीती त्यांना वाटते. दलित हिंदूंची होणारी हत्या काँग्रेससाठी महत्त्वाची नाही. त्यांना केवळ त्यांच्या मतपेटीची चिंता असते, अशीही टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
‘भारत गुलाम बनला आहे’
काँग्रेसने सत्तेला प्रथम स्थान दिले आणि देशाला आपली खासगी मालमत्ता आणि कुटुंबाला मिळालेला वारसा मानले, असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. “अंतर्गत कलह, जात, प्रांत आणि भाषेवर आधारित विभागणी झाल्यामुळे भारत गुलाम बनला आहे. जेव्हा अशाप्रकारे अंतर्गत कलह असतो तेव्हा त्यात सहजपणे षडयंत्राचा शिरकाव होतो”, अशीही टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
