पीटीआय, चित्रकूट: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे समर्थन केले. “या न्यासाशी संबंधित जवळपास १५० लोक असून मंदिर देणग्या अपहारप्रकरणी केवळ आठ जणांविरोधात पुरावे सापडले आहेत. अशा वेळी मूठभर लोकांनी केलेल्या गैरकृत्यामुळे संपूर्ण न्यासाची बदनामी करता कामा नये,” असे योगी म्हणाले.
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे अयोध्या आणि श्रीरामाचा वारसा कलंकित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आदित्यनाथ यांनी केली. देणगी अपहार प्रकरणी न्यासाच्या शिफारशीवरून राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले असे त्यांनी सांगितले. चित्रकूट येथे एका प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी बोलताना योगींनी विरोधकांना लक्ष्य केले. हे दोन्ही पक्ष दुतोंडी असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, काँग्रेसने याप्रकरणी न्यासाचा राजीनामा दिलेले चंपत राय यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच न्यासावर चुकीचे सदस्य निवडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. तर, राम मंदिराच्या देणग्या चोरीला गेल्यामुळे जगभरात देशाची प्रतिमा डागाळली आहे आणि सनातन धर्माच्या अनुयायी संतप्त झाले आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष अचानक सक्रिय झाले आहेत. या पक्षांनी भूतकाळात अयोध्येवर टीका केली आहे आणि आता त्यांना फायदा मिळवण्यासाठी एक मुद्दा मिळाला आहे. – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
