भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्यासाठी योगी सरकारनं दिल्लीलगत नोयडा येथे १००० एकर जागेचा शोध घेतला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या यमुना एक्प्रेसवे इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट ऑथरिटीनं (YEIDA) सोमवारी यासंदर्भातील प्रस्ताव योगी सरकारकडे पाठवला.

या प्रकल्पाच्या विशेष कर्तव्यावर असलेले YEIDA चे अधिकारी शैलेंद्र भाटिया याबाबत पीटीआयशी बोलताना म्हणाले, “फिल्मसिटीसाठी शोधण्यात आलेली प्रस्तावित जागा ही सेक्टर २१ मध्ये असून जी दिल्ली-आग्रा यमुना एक्प्रेसवे लगत आहे. प्रस्तावित जेवार विमानतळापासून ती केवळ ६ किमी अंतरावर तर ईस्टर्न पेरिफेरल एक्प्रेसवेपासून १२ किमी अंतरावर आहे.” या जागेकडे जाण्यासाठी रस्त्यांची चांगली सोयही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही जागा दिल्लीपासून ७० किमी, आग्र्यापासून १५० किमी अंतरावर आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १८ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्मसिटी साकारणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी दिल्लीच्या सीमेलगत नोयडा किंवा ग्रेटर नोयडा भागात जागा शोधण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.