‘काट्याने काटा काढायचा’ या मराठीतील म्हणीप्रमाणे अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी अतिरेक्यांचाच वापर करण्याचे धोरण आखण्यास आपण मागे पुढे पाहणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात स्पष्ट केले. केंद्रातील गेल्या सरकारांपेक्षा मोदी सरकार पूर्णपणे वेगळे असून, अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपण लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त ‘आजतक’ वृत्तवाहिनीने नवी दिल्लीमध्ये ‘आजतक मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पर्रिकर यांनी वरील मुद्दा मांडला. ते म्हणाले, जर पाकिस्तान किंवा इतर कोणताही देश भारताविरूद्ध कारवाई करण्याचे नियोजन करीत असेल. तर आम्ही केवळ प्रतिक्रियात्मक कृती न करता स्वतःहून काही पावले उचलू. सगळ्या गोष्टी सार्वजनिकपणे करणार नाही. पण माझ्या स्तरावर मला जे करणे योग्य वाटेल, ते ते मी करेन. मग त्यामध्ये व्युहात्मक धोरण आखणी असेल किंवा दबावतंत्राचा वापर करणे असेल किंवा काट्याने काटा काढतात या मराठीतील म्हणी प्रमाणे अतिरेक्यांना नमविण्यासाठी प्रसंगी अतिरेक्यांचाच वापर करण्याचे धोरण असेल.
अतिरेक्यांचे अनेक योजना आतापर्यंत उधळून लावण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांतील घटना बघितल्यास असे दिसून येईल की लष्कराच्या जवानांना अतिरेकी कुठे लपून बसले आहेत, याचा ठावठिकाणी माहिती होता. त्यामुळे जवानांनी तिथे जाऊन त्यांच्यावर कारवाई केली. सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, हे माहिती असल्यामुळेच जवान ही कारवाई करू शकले. संरक्षणमंत्री या नात्याने मी कायम लष्कराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.