ममता बॅनर्जींच्या पक्षाचे आमदार मदन मित्रा यांनी बंडखोर गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार शाब्दिक प्रहार केला आहे. तसंच ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं असंही त्या तृणमूलच्या आमदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी भाजपावर काय टीका केली?

ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपाला वाटतं आहे की मला हार्ट अटॅक यावा, पण तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत मी तुमचा अंत पाहणार नाही. माझा भाजपासाठी हा खास संदेश आहे असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. बुधवारी ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील रिताब्रत बॅनर्जी यांनी बंडखोरांच्या गटात जाणं पसंत केलं. त्यांनी सांगितलं की मी टीएमसीला रामराम केलं कारण कारण पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना सहा महिन्यांसाठी पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. जी मागणी मान्य करण्यात आली नाही. मित्रा यांनी पक्ष सोडल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की मदन मित्रा यांनी पक्ष सोडला कारण त्यांना ईडीचं समन्स आलं होतं. त्यांच्या पत्नीला आणि दोन मुलांनाही ईडीकडून समन्स आले होते. त्यामुळे टीएमसीमध्ये अन्याय होत होता वगैरे म्हणणं हे फक्त नाटक आहे. ईडी कारवाईपासून सुटका व्हावी म्हणून ते भाजपासह गेले आहेत असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्या देशद्रोही लोकांच्या वतीने मी पश्चिम बंगालच्या जनतेची माफी मागते. माझं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी माझा विवेक, माझी तत्त्वं, माझी विचारसरणी विकलेली नाही. भाजपाने तपास यंत्रणा आणि पोलिसांचा वापर करुन माझा पक्ष फोडला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत आमचे अजूनही १८ खासदार आहेत. जे सेटिंग कंपनीत गेलेत ते खासदार पोलीस आणि ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे तिकडे गेले आहेत अशी टीका ममता बॅनर्जींनी केली.