BJP MLA Saroj Padhi vs IAS Samir Kumar Jena: ओडिशामध्ये पूर मदतकार्यादरम्यान भाजपा आमदाराने गैरवर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका तरुण आयएएस अधिकाऱ्याने केला आहे. असिका मतदारसंघाचे भाजपा आमदार सरोज पाधी यांच्याविरोधात संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गंजाम जिल्हा परिषदेचे मुख्य विकास अधिकारी तथा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले २०२२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी समीर कुमार जेना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पूरस्थितीमुळे जेना यांच्यावर असिका भागातील मदत आणि पुनर्वसन कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी आमदार सरोज पाधी यांनी जेना यांच्या दालनात प्रवेश केला आणि पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या मदत साहित्यावरून त्यांच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. हे मदत साहित्य मंत्री बिभूती जेना यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आले असून दिलेल्या निर्देशानुसारच त्याचे वाटप सुरू असल्याचे अधिकाऱ्याने आमदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
“मी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि या विषयावर थेट संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी माझे काहीही ऐकून न घेता अश्लील आणि असंसदीय भाषेत शिवीगाळ सुरूच ठेवली. तसेच मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तत्काळ तेथून निघून जाण्यास सांगितले,” असा आरोप जेना यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
हा संपूर्ण प्रकार दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावाही अधिकाऱ्याने केला आहे. “या धक्कादायक प्रकारामुळे माझे मनोबल खचले असून मी तीव्र मानसिक धक्क्यात आहे,” असे जेना यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या संदर्भात गंजामचे पोलीस अधीक्षक हरिषा बी. सी. यांच्याशी द इंडियन एक्सप्रेसने संपर्क साधला असता, तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा आमदाराने काय म्हटले?
दुसरीकडे आमदार सरोज पाधी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रकार केवळ गैरसमजातून घडल्याचा दावा केला आहे. “आमच्यातील गैरसमज आम्ही परस्पर चर्चेतून दूर केले असून हा वाद आता मिटला आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची मला कल्पना आहे, मात्र मी संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली. पुराच्या गंभीर परिस्थितीत आम्ही सर्वजण तणावाखाली काम करत होतो, त्यामुळे काही गैरसमज झाले,” अशी प्रतिक्रिया पाधी यांनी भुवनेश्वरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान ही घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेले असिका नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राजेश कुमार महापात्रा यांची नगरविकास विभागात तत्काळ बदली करण्यात आली आहे. आमदार सरोज पाधी यांच्या समर्थकांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात एका पंचायत समितीच्या बैठकीत महिला सरपंचाशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता; त्यानंतर आता थेट आयएएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप झाल्याने हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
