मध्य प्रदेशात एक तरुणी, तिच्यासोबत पळून जाणारा तरुण आणि यासाठी मदत करणारी मुलीची अल्पवयीन बहीण या तिघांसोबत मोठं गैरवर्तन केल्याचं प्रकरण घडलं आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघांच्याही गळ्यात टायर लटकवले आणि लोकांसमोर गाण्यावर नाचण्यास भाग पाडलं. धार जिल्ह्यातील गंधवानी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंद करण्यात आली आहे. १४ वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. यानंतर या १९ वर्षीय मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि नातेवाईकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २५४, ३२३, ५०६, ३५४, ३६३, ३४३ आणि १४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धार जिल्हा एसपी आदित्यसिंह यांनी सांगितलं की, या घटनेतील पाच आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ह्या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाची बाब म्हणजे १९ वर्षीय मुलीसोबत पळून जाणाऱ्या युवकावर यापूर्वी याच मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्या युवकाला अटक देखील करण्यात आली.

मध्य प्रदेशातील या प्रकाराच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक जण तरुणाला काठीने मारताना देखील दिसत आहेत. ही संपूर्ण घटना गंधवानी येथील कुंडी गावाची असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुला-मुलीच्या घरातून पळून जाण्याशी आणि लहान बहीणने आपल्या मोठ्या बहिणीला मदत करण्याशी संबंधित आहे. या प्रकरणी सोमवारीच आरोपीविरोधात गांधवानी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत, एक वगळता बाकीच्यांनाही अटक करण्यात आली आहे.