Youth Congress leader killed Karnataka update : कर्नाटकातील ३२ वर्षीय युवक काँग्रेस नेते फायरोझ पठाण यांची शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, धारवाड येथील पठाण यांच्या राहत्या घरी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास हा प्रकार घडला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

    घरात घुसून हत्या

    घटनेच्या वेळी पठाण त्यांच्या घराच्या ओसरीवर बसले होते. तेव्हा निळ्या आणि पांढऱ्या चौकटीचा शर्ट घातलेला एक व्यक्ती घरात शिरला आणि त्यांच्या शेजारी येऊन बसला. दरम्यान, इतर दोन तरुण गेटच्या बाहेर उभे राहिले.

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये पठाण घराच्या प्रवेशद्वारावर कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत आहेत. त्याच वेळी चौकटीचा शर्ट घातलेला व्यक्ती त्यांच्या मागे जातो आणि अचानक त्यांच्या पोटावर वार करतो. जखमी पठाण घराच्या आत पळतात, तेव्हा तो हल्लेखोर आणि बाहेर थांबलेले इतर दोघेही त्यांच्या मागे धावतात. थोड्याच वेळात आणखी एक व्यक्ती त्यांच्यात सामील होते.

    पठाण यांच्यावर वार केल्यानंतर अवघ्या ४० सेकंदात चारही हल्लेखोर एकामागून एक घराबाहेर पडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेजारील नागरिक गोंधळून गेले होते. पठाण यांचा मृतदेह नंतर बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यांच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली होती.

    १५ दिवसांनी होणार होतं लग्न

    फायरोझ पठाण यांचा २४ एप्रिल रोजी विवाह होणार होता, मात्र त्यापूर्वीच या निर्घृण हल्ल्यात त्यांचा अंत झाला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी हत्या करून तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित पळून जाताना दिसत असून, तपासात ही दृश्ये महत्त्वाची ठरणार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. हत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.