New Delhi AI Summit Controversy : नवी दिल्लीत नुकतीच ‘एआय इम्पॅक्ट समिट’ पार पडली. खरं तर ही समिट एका रोबोडॉगवरुन चांगलीच गाजली. या समिटमध्ये नोएडाच्या गलगोटियास विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबोटिक डॉग स्वतः विकसित केल्याचा दावा केला. त्यामुळे या समिटची अवघ्या देशात चर्चा झाली. एवढंच नाही तर या समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे समिटमध्ये मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, युवक काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी “PM Is Compromised” (पंतप्रधानांनी तडजोड केली) अशा घोषणा दिल्या. पण या गोंधळानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. यानंतर या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या या आंदोलनाबाबत न्यायालयात एक धक्कादायक दावा केला आहे.
‘युवक काँग्रेसचं एआय समिटमधील निदर्शन हे नेपाळच्या Gen-Z आंदोलनापासून प्रेरित होतं’, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, या निदर्शनामागे मोठा कट असल्याचा संशय आहे. एआय समिटमधील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत अंगावरील कपडे काढून आंदोलन करण्यात आल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय केलं होतं?
दिल्लीतील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून घोषणाबाजी करत गोंधळ केला होता. युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते टी-शर्ट काढून आतमध्ये घुसले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. यावेळी कार्तकर्ते आणि येथील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती, त्यामुळे या कार्यक्रमात मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता.
भाजपाकडून काँग्रेसवर टीका
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीचे काँग्रेसकडून राहुल गांधींचे सोल्जर म्हणत कौतुक करण्यात आले. तर, भाजपाने काँग्रेसवर सडकून टीका केली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, किरेन रिजिजू भाजपा खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेसवर कठोर शब्दात टीका केली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी याबाबत सर्व नियोजन झाल्याचा आरोप खासदार संबित पात्रा यांनी केला.

