पीटीआय, नवी दिल्ली – युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या प्रदर्शनी सभागृहात ‘शर्टलेस’ आंदोलन करत घोषणाबाजी केली. हातामध्ये सरकारविरोधी आणि भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात घोषणा लिहिलेले टी-शर्ट घेऊन हे कार्यकर्ते सभागृहात फिरत होते. या घटनेवर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
प्रगती मैदानावरील ‘भारत मंडपम’ येथील प्रदर्शनी सभागृह क्र. पाचमध्ये दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमारे १० कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे असलेले पांढरे टी-शर्ट हातात घेतले होते. त्यावर विविध प्रकारचे संदेश छापण्यात आले होते. या आंदोलनामुळे परिषदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळानंतर सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना सभागृबाहेर काढले. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उपस्थितांशी बाचाबाची आंदोलक बाहेर पडत असताना त्यांची काही उपस्थितांशी बाचाबाची झाली. एका आंदोलकाला एका पाहुण्याने मारहाणही केली. ‘तुम्ही देशाची प्रतिमा मलिन करत आहात, तुम्ही स्वतः विकले गेले आहात,’ अशा शब्दांत एका पाहुण्याने आंदोलकांना सुनावले.
भाजपची टीका
काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपने टीका केली आहे. काँग्रेससाठी माझ्याकडे तीनच शब्द आहेत, टॉपलेस-ब्रेनलेस आणि शेमलेस’, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले. तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या आंदोलनाला देशद्रोही कृत्य ठरवले. तसेच आंदोलकांनी काँग्रेसचा ‘एआय’विरोधी चेहरा उघडा केल्याचेही त्यांनी म्हटले.
काँग्रेसचे प्रत्युत्तर शांततापूर्ण निषेधाच्या माध्यमातून युवक काँग्रेसने एआय परिषदेत तरुणांमधील संतापाचे प्रतिबिंब उमटवले. परंतु माध्यमांनी चुकीच्या ठिकाणी आंदोलन केल्याचे, तसेच यातून देशाची बदनामी झाल्याचे म्हटले. त्यावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रत्युत्तर देताना निषेधासाठी आदर्श स्थळाची मागणी केली. ‘कोणाच्या तरी तळघरात निषेध करायला हवा का? लोक जिथे पाहतात तिथे निषेध केला जातो. जिथे माध्यम, कॅमेरे असतात तिथे निषेध केला जातो,’ असे ते म्हणाले. भाजपचेही आंदोलन
नवी दिल्ली : ‘एआय समिट’मधील काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून, भाजप युवा मोर्चाने राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. सुनेहरी बाग रस्त्यावरील गांधी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलकांनी पुतळा जाळत घोषणाबाजी केली. भारताच्या वाढत्या ताकदीमुळे काँग्रेस नेते अस्वस्थ आहेत, असा आरोप दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला.
