सध्या स्मार्टफोन हे केवळ संवादाचं माध्यम न राहता आता सामाजिक स्टेटस बनल्याचं दिसून येत आहे. यामध्ये विशेषतः तरुणांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठा, कंटेंट क्रिएशन किंवा आणखी काही वेगळ्या कारणास्तव तरुणांना आयफोन हवा असतो. हा आयफोन मिळवण्यासाठी काही तरुणांनी तर टोकाची पावलं उचलल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत.

अनेकांमध्ये आयफोनची क्रेझ का असते तर, कॅमेरा क्वालिटी, शानदार परफॉर्मेंस, प्रीमियम डिझाइन, फीचर्स यासाठी आयफोनची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे तरुणांना आयफोन हवा असतो. दरम्यान, आता आयफोन मिळवण्यासाठी एका तरुणाने केलेल्या कृतीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे आयफोन घेवून देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना आसाममध्ये घडली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील तेथील कामाचा आणि लोकांच्या समस्या जाणून घेत होते. मात्र, यावेळी अचानक एक तरुण आला आणि त्या तरुणाने थेट मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे आयफोन घेवून देण्याची मागणी केली.

“सर मला आयफोन हवा आहे”, असं या तरुणाने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना म्हटलं. या तरुणाने आयफोनची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील अवाक झाले. त्यानंतर ते क्षणभर थांबले आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी त्या तरुणाला विचारलं की, “आयफोन? तुला जुना आयफोन हवा की नवा? बरं ठीक आहे, आम्ही तुला आयफोन देऊ. तुला आयफोन मिळेल”, असं आश्वासन हिमंता बिस्वा सरमा यांनी दिलं.

दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं कौतुक केलं आहे. तसेच अनेकांनी त्या तरुणाला सुनावलं आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी त्या तरुणाला खरोखर आयफोन मिळाला का? असा सवाल केला आहे.